औरंगाबाद: पुण्याच्या ट्रॅव्हल्स कंपनीकडून विनाचालक कार भाड्याने घेऊन राज्यात विविध ठिकाणी दुकाने फोडणाºया टोळीतील दोघांना क्रांतीचौक ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने पाठलाग करून शिताफीने अटक केली. औरंगाबाद शहरातील ३ दुकाने आरोपींनी फोडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
सुजाराम पुनबाराम माली (२४) आणि जितेंद्रकुमार मांगीलाल माली (२३, दोघे रा. राजस्थान) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्या दोन साथीदारांचा शोध सुरू आहे. क्रांतीचौक पोलिसांनी सांगितले की, व्यापारी रमेश झंवर यांचे गोमटेश मार्केटमधील पशुऔषधालय ३१ जुलैच्या रात्री फोडून चोरट्यांनी गल्लयातील ४९ हजार ५५० रुपये पळविले होते. या दुकानाशेजारील कापड दुकान फोडून जीन्स पॅण्ट आणि अन्य कपडेही चोरून नेले होते. तत्पूर्वी १५ जुलैला गुलमंडी येथील चितलांगे गिफ्ट सेंटरचे शटर उचकटले. परंतु आत मोठी काच असल्याने चोरट्यांना दुकानात प्रवेश करता आला नव्हता. झंवर यांनी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. या घटनेनंतर पोलीस निरीक्षक उत्तम मुळक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ, पोलीस उपनिरीक्षक सोनटक्के, सायबर ठाण्याच्या उपनिरीक्षक सुशीला खरात, डी. बी. पथकातील कर्मचारी नसीम खान, शेख सलीम,राजेश फिरंगे, मिलिंद भंडारे आणि हनुमंत चाळणीवाड यांच्या पथकाने तपास सुरू केला. सीसीटिव्ही कॅ मेºयात चोरटे आणि त्यांची कार कैद झाली होती. चोरटे बिनधास्तपणे शटर उचकटून चोरी करताना दिसले. अधिक तपासाअंती चोरटे शहराबाहेरील असल्याचे त्यांना समजले.कारवरील नावामुळे लागला चोरट्यांचा शोधकारवर रेव्ह हे इंग्रजी नाव पोलिसांना दिसले. पोलिसांनी इंटरनेटवर या नावाचा संदर्भ शोधला तेव्हा या नावाची एक ट्रॅव्हल्स कंपनी पुण्यात असून ती कंपनी विना चालक कार भाड्याने देत असल्याचे, तसेच त्याच्या सर्व कारला जीपीएस यंत्रणा लावण्यात आल्याचे समजले. पोलिसांचे पथक त्या ट्रॅव्हल्स कंपनीकडे गेले आणि ३१ जुलै रोजी औरंगाबादला कोणी कार नेली होती, याबाबत माहिती घेतली. तेव्हा कार बुकींग करणाºयाचा मोबाईल नंबर, आधारकार्ड पोलिसांना मिळाले. तेव्हापासून पोलीस त्यांच्यावर नजर ठेवून होते. मात्र ते सारखे शहर बदलत होते. दरम्यान आरोपी समर्थनगर येथे आल्याचे कळताच पोलिसांनी एका लॉजमधून त्यांच्या मुसक्या आवळल्या.