पैठण : जायकवाडी धरणाचा साठा ९७ टक्के झाला आहे. त्यामुळे शुक्रवारी दुपारी जलविद्युत प्रकल्पाच्या सांडव्यातून गोदावरी पात्रात १५८९ क्युसेक क्षमतेने विसर्ग करण्यात आला होता. यानंतर शनिवारी (दि. ०५ ) दुपारी १२:३० वाजता धरणाचे १० आणि २७ क्रमांकाची दोन दरवाजे अर्धाफूट उंचीने उघडून १०४८ क्यूसेक विसर्ग गोदवारी पात्रात करण्यात आला. धरणातून सद्यस्थितीत द्वार क्रं १०,२७ मधून १०४८ क्यूसेक व जलविद्युत केंद्रामधून १५८९ क्यूसेक असा एकूण २६३७ क्यूसेक इतका विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरु आहे. नाथसागरातून सन १९७५ ते १९२० या दरम्यान पाणी सोडावे लागण्याचे हे २१ वे वर्ष आहे.
जायकवाडी धरणाजवळील बॅकवॉटर परिसरात गुरुवारी रात्री जोरदार पाऊस झाल्याने ९७ टक्के जलसाठा झाला. त्यामुळे शुक्रवारी दुपारी जलविद्युत प्रकल्पाच्या सांडव्यातून गोदावरी पात्रात १५९० क्युसेक क्षमतेने विसर्ग करण्यात आला. धरणावरील जलविद्युत प्रकल्प सुरू झाल्याने नॅशनल ग्रीडमध्ये १२ मेगावॅटची भर पडणार आहे. जलविद्युत प्रकल्पातून सोडलेले पाणी अडविण्यासाठी जायकवाडी धरणाखालील चनकवाडीजवळ बंधारा बांधण्यात आला आहे. १५ दिवसांपूर्वी पूरनियोजनाअंतर्गत या बंधाऱ्याचे दरवाजे उघडून ठेवण्यात आल्याने जलविद्युत निर्मितीनंतर धरणाबाहेर पडणारे पाणी वाया जाऊ नये म्हणून जलविद्युत प्रकल्प बंद करण्यात आला होता. दरम्यान, गुरुवारी बॅकवॉटर परिसरातील जोरदार पावसामुळे सकाळी डाव्या कालव्यातून १०० क्युसेक क्षमतेने विसर्ग सुरू करण्यात आला. यानंतर दुपारी जायकवाडीचे अधीक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी जलविद्युत प्रकल्प सुरू करण्याचे आदेश दिले. मुख्य अभियंता तवार, तहसीलदार चंद्रकांत शेळके, बुद्धभूषण दाभाडे, संदीप राठोड यांच्या उपस्थितीत जलविद्युत प्रकल्प सुरू झाला.
वरील धरणांतून आवक घटलीनाशिक व अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पावसाचा वेग कमी झाल्याने या जिल्ह्यांमधील धरण समूहातून जायकवाडी धरणासाठी होणारा विसर्ग घटविण्यात आला आहे. यामुळे जायकवाडीकडे येणारी आवक घटली आहे.