औरंगाबाद : एमआयएम पक्षाचे माजी नगरसेवक अब्दुल रहीम शेख हनिफ नाईकवाडी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना मंगळवारी दुपारी सेंट्रल नाका परिसरात घडली. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून, या प्रकरणी सात जणांच्या विरोधात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा सिडको पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे.
आरोपींमध्ये शेख नासेर शेख सत्तार, शेख निसार शेख सत्तार, अन्सार शेख सत्तार, शेख अर्शद शेख सत्तार, शेख लियाखत शेख सत्तार, शेख सत्तार शेख सरदार आणि गनी पटेल (सर्व रा. चिश्तिया कॉलनी) यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नासेर शेख व नाईकवाडी यांच्यात जमिनीवरून जुना वाद आहे. मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास सेंट्रल नाका परिसरात दोन गट समोरासमोर आले. हल्ल्यात नाईकवाडी यांच्या डोक्याला मार लागल्याने ते रक्तबंबाळ होऊन कोसळले. नासेर शेख यांच्या गटातीलही काही जण जखमी झाले. ही माहिती समजताच सिडकोचे निरीक्षक संभाजी पवार, उपनिरीक्षक अशोक अवचार, कृष्णा घायाळ, रमेश राठोड, शिंदे हे फौजफाट्यासह पोहोचले. तोपर्यंत दोन्ही गटांच्या समर्थकांची पांगापांग झाली होती. नाईकवाडी यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सिडको पोलिसांनी नाईकवाडी यांचे भाऊ शेख तय्यब शेख हनीफ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सात जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविला. तपास उपनिरीक्षक अशोक अवचार करीत आहेत.
चार जणांना अटकसिडको पोलिसांनी शेख नासेर, शेख निसार, शेख अन्सार आणि शेख सत्तार या चार जणांना अटक केल्याची माहिती निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली. या दोन्ही गटांत चार महिन्यांपूर्वीही तुंबळ हाणामारी झाली होती. तेव्हा दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी नोंदविल्या होत्या.