सुनील घोडके
खुलताबाद:-दौलताबाद घाट हा रविवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी दुपारी तीन ते पाच वाजेच्या सुमारास जाम झाल्यामुळे पर्यटक व भाविकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
वाहतूक कोंडी ही कागजीपुरा गाव ते देवगिरी किल्ला प्रवेशद्वार पर्यंत अशी ४ किलोमीटर पर्यंत झाली होती. मात्र या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी कोणीही उपलब्ध नसल्याने खुलताबाद उरूस बघण्यासाठी येत असलेल्या नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेत वाहतूक सुरळीत करण्याचे काम केले मात्र तरी देखील पोलीस प्रशासनाच्या वतीने कोणीही लवकर न आल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
वास्तविक पाहता रविवार व त्यातच वेरूळ लेणी, श्री घृष्णेश्वर मंदिर आणि सध्या खुलताबाद उरूस सुरू असल्याने नागरिकांचा ओढा हा वेरूळ- खुलताबाद कडे मोठ्या प्रमाणात असतो. याची दखल वाहतूक पोलीस यांनी न घेतल्याने येथे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला. तरी दौलताबाद घाटातील वेशीजवळ जवळ शनिवार रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीस कर्मचारी असावेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.