लोकमत न्यूज नेटवर्कनळदुर्ग : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून घरफोड्या, दुकानफोड्यांसह वाहन चोरीचे सत्र सुरूच आहे़ शुक्रवारी मध्यरात्री तुळजापूर तालुक्यातील इटकळ येथे दोन घरे फोडून अडीच लाखाचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे़ तर उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथे दत्त मंदिरातील दानपेटी व दोन पितळी मुर्त्या लंपास केल्या आहेत़याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, इटकळ येथील बाळासाहेब पांडुरंग बागडे यांचे राष्ट्रीय महामार्गालगत घर आहे़ उकाड्यामुळे बागडे व कुटुंबिय घराच्यावरील मजल्यावर झोपले होते़ चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या घरात घुसून तीन कपाटातील गंठण, झुमके, ठुसी, अंगठी असे ४ तोळे सोन्याचे दागिने, रोख सहा हजार रूपये, दोन मोबाईल असा ९६ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़ इटकळ येथीलच अल्लाउद्दीन महामुद सुभानभाई यांचे घर चोरट्यांनी फोडले़ घरातील कपाट तोडून आतील बोरमाळ, गळासरी, कानातील फुले अशी दोन तोळ्यांचे दागिने, व रोख ८० हजार रूपये असा दीड लाखाचा मुद्देमाल लंपास केला़ घटनेची माहिती मिळताच इटकळ औटपोष्टचे पोलीस हवालदार राजाभाऊ सातपुते यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला़ यावेळी बोलाविण्यात आलेले श्वान पथकही परिसरातच घुटमळले़ या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सपोनि प्रल्हाद सुर्यवंशी, हवालदार राजाभाऊ सातपुते हे करीत आहेत़
इटकळमध्ये दोन घरे फोडली
By admin | Published: May 27, 2017 11:47 PM