औरंगाबाद : जलयुक्त शेतशिवार कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील दोनशे गावांची निवड करण्यात आली असून, आगामी वर्षात ही गावे टँकरमुक्त करण्यात येणार आहेत, असे जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी आज सांगितले. सातत्याने उद्भवणाऱ्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जलयुक्त शेतशिवार कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत गावात जलसंधारणाची विविध कामे केली जाणार आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात या प्रकल्पासाठी पहिल्या वर्षी दोनशे गावांची निवड करण्यात येणार आहे. निवड केलेल्या दोनशे गावांमध्ये जलसंधारणाची कामे करून ही गावे वर्षभरात टँकरमुक्त केली जाणार आहेत, असे जिल्हाधिकारी विक्रमकुमार म्हणाले. या गावांमधील प्रकल्पांमधील गाळ काढणे, प्रकल्पांची दुरुस्ती करणे, छोट्या पातळीवर नदी जोड प्रकल्प राबविणे आदी कामांचा या कार्यक्रमात समावेश आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीतून(डीपीडीसी) तून सहा टक्के निधी खर्च करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. याशिवाय इतर विविध शीषर्काखालीही निधी उपलब्ध होणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि इतर योजनांमधून कामे करता येणार आहेत, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
जिल्ह्यातील दोनशे गावे होणार टँकरमुक्त
By admin | Published: January 02, 2015 12:40 AM