बाळासाहेब जाधव , लातूरगणेशोत्सव अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे़ त्यामुळे गुलालाच्या खरेदी-विक्रीत मोठी वाढ झाली आहे़ गणेशभक्तांचा आनंद द्विगुणित करणारा गुलाल हा महत्वाचा घटक असल्यामुळे दिवसाकाठी लातूर जिल्ह्यातून दोनशे पोत्यांची विक्री होत आहे़गणपती उत्सव अवघ्या तीन दिवसांवर येवून ठेपल्याने गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण आले आहे़ सध्या चौकाचौकात लेझीम पथकासह विविध कार्यक्रमाची तयारी जोरदार सुरु आहे़ गणेशभक्तांच्या उत्साहात भर पाडणाऱ्या गुलालाच्या विक्रीसाठी जिल्हाभरात १५० ते २०० दुकाने थाटली आहेत़ या दुकानाच्या माध्यमातून दिवसाकाठी २०० पोत्याची विक्री होत आहे़ यामध्ये ८८८ या प्रकारातील गुलाल डोळ्याला त्रास न होणारा असल्यामुळे या गुलालाची विक्री ४०० रु़ प्रती पोते या प्रमाणे होत आहे़ साध्या गुलालाची विक्री १०० रु़ प्रती पोते याप्रमाणे लातूरच्या बाजारात होत आहे़ गुलालाची आवक सोलापूर जिल्ह्यातील केनगाव येथून होत आहे़ यावर्षी पावसाची परिस्थिती गंभीर असल्यामुळे गुलालाची आवक मंदावली असली तरी गुलालाची विक्री कायम आहे़ आहे त्या किमतीमध्ये गुलालाची खरेदी करुन गणपती उत्सव साजरा करण्याचा मानस गणेश भक्तात आहे़ गुलालाचे गतवर्षीचेच दर असल्याचे ठोक विक्रेते गणेश डोईजड यांनी सांगितले.
दोनशे पोते गुलालाची दररोज लातुरात विक्री
By admin | Published: August 27, 2014 12:57 AM