पाचोड : औरंगाबाद ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाचोडजवळील मुरमा शिवारात शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास बीडहून सुसाट वेगाने आलेल्या कारने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील दोन्ही बांधकाम मजूर ठार झाले.
पाचोड पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डोणगाव (ता. अंबड, जि. जालना) येथील रहिवासी मुस्तुफा लालखा पठाण (३५) व कडूबा निवृत्ती काशीद (३५) हे दोघे मित्र सोबतच बांधकाम मजुरीचे काम करत होते. गावातील एकाच्या बांधकामासाठी फरशी कट करण्यासाठी लागत असलेले ब्लेड आणण्यासाठी ते शुक्रवारी पाचोडला दुचाकीने चालले होते. सकाळी ९ च्या दरम्यान औरंगाबाद ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मुरमा शिवारात त्यांच्या दुचाकीला बीडहून औरंगाबादकडे सुसाट निघालेल्या कारने पाठीमागून जोराची धडक दिली. अपघातात दोघेही उंच उडून रस्त्यावर पडले. यात मुस्तुफा पठाण हे जागीच ठार झाले, तर कडुबा काशीद हे गंभीर जखमी झाले होते. अपघातात दुचाकीचाही चुराडा झाला. मुरमा व कोळीबोडखा शिवारातील नागरिकांनी पाचोड पोलिसांना माहिती दिली. स.पो.नि. अतुल येरमे, पोलीस जमादार किशोर शिंदे, पो.ह. फिरोज बरडे, नरेंद्र अंधारे, आयुब पठाण यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत जखमींना पाचोड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी भोजने, डॉ. बाबासाहेब घुगे, डॉ. साकीब सौदागर यांनी मुस्तुफा पठाण यांना मृत घोषित केले, तर प्रकृती गंभीर असल्याने कडुबा काशीद यांना पुढील उपचारासाठी औरंगाबादला पाठविले. मात्र, वाटेतच त्यांचाही मृत्यू झाला.
दोन्ही मृतदेहांची उत्तरीय तपासणी पाचोड रुग्णालयात करण्यात येऊन मृतदेह नातेवाईकांना सोपविण्यात आले. पाचोड पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून कारचालक व कार ताब्यात घेतली आहे. या प्रकरणाची नोंद पाचोड ठाण्यात करण्यात आली आहे. गावात सुस्वभावी म्हणून ओळख असलेल्या या दोन्ही मित्रांच्या मृत्यूमुळे नागरिक हळहळ व्यक्त करीत आहेत.
फोटो : आहे.