औरंगाबाद : कोरोना रुग्णांसाठी जीवनदायी ठरणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा शहरात सर्रास काळाबाजार सुरु आहे. ३५ हजार रुपयांना एक रेमडेसिविर विक्री करण्यासाठी आलेल्या खाजगी प्रयोगशाळा चालकासह दोन जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी रात्री अटक केली. त्यांच्याकडून ६ रेमडेसिविर इंजेक्शन जप्त केले. परभणी येथील एका औषधी एजन्सी चालकाकडून त्यांनी हे रेमडेसिविर आणल्याची कबुली दिली.
संदीप आप्पासाहेब चवळी(२१, रा. सातारा परिसर) आणि गोपाल हिरालाल गांगवे (१९, रा. सातारा परिसर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. संदीप हा सातारा परिसरातील रेणुकामाता मंदिराजवळ युनी पॅथॉलॉजी लॅब चालवितो, तर गोपाल पुंडलिकनगर येथील एका लॅबवर काम करतो. कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिविर इंजेक्शनची मात्रा लागू पडत आहे. रेमडेसिविरचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांचे नातेवाईक मिळेल त्या किमतीत रेमडेसिविर खरेदी करुन रुग्णाला देत आहेत. याचाच गैरफायदा नफेखोरांनी घेण्यास सुरुवात केली. बाजारात रेमडेसिविर उपलब्ध नसल्याचे पाहून आरोपींनी गरजू रुग्णांच्या नातेवाईकांना गाठून ३५ हजारांत एक रेमडेसिविर विक्री करण्यास सुरुवात केली. याविषयी सोमवारी गुन्हे शाखेला माहिती मिळताच सहाय्यक आयुक्त रवींद्र साळोखे, पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे, हवालदार संतोष सोनवणे, भगवान शिलोटे, रितेश जाधव, विशाल पाटील, आनंद वाहुळ, राजकुमार सूर्यवंशी आणि शिनगारे यांच्या पथकाने खबऱ्यामार्फत आरोपीशी संपर्क साधला. तेव्हा त्याने प्रति इंजेक्शन ३५ हजार रुपये असा दर सांगितला. शिवाय तत्काळ आणि रोखीने पैसे द्यावे लागतील, अशी अट घातली. दोन इंजेक्शनचे पैसे जमा असल्याचे त्याला सांगितले. यानंतर सायंकाळी चवळी याने पोलिसांच्या खबऱ्याला पैसे घेऊन पुंडलिकनगर रोडवरील मिठाई दुकानाजवळ बोलावले. पोलिसांनी औषधी निरीक्षक जीवन जाधव यांच्यासह तेथे सापळा लावला होता. चवळी तेथे आला आणि त्याने दोन इंजेक्शन पोलिसांच्या खबऱ्याला दाखविले. तेव्हा आणखी दोन इंजेक्शन पाहिजे असल्याचे पोलिसांनी खबऱ्याला सांगायला लावले असता चवळीने त्याचा साथीदार गांगवे याला फोन करुन बोलावून घेतले. गांगवेने इंजेक्शन आणल्याचे दिसताच खबऱ्याने पोलिसांना इशारा केला. पोलिसांनी त्यांना तेथेच पकडले. यावेळी दोन्ही आरोपींजवळ सहा रेमडेसिविर इंजेक्शन आढळून आले. आरोपीना अटक करून त्यांच्याविरुद्ध पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
==================
चौकट
तीन रेमडेसिविर इंजेक्शन सरकारी
गुन्हे शाखेने जप्त केलेल्या सहापैकी तीन रेमडेसिविर इंजेक्शन हे राज्य शासनासाठी कंपनीने तयार केले आहेत. याबाबतची माहिती रेमडेसिविरच्या बॉक्सवर नमूद आहे. ते विक्रीसाठी नसल्याचा उल्लेख आहे. यावरून शासकीय रुग्णालयातून ते चोरले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
======================
रेमडेसिविरच्या पुरवठादाराचा शोध सुरू
चवळी आणि गांगवे यांनी परभणी येथील शेळके नावाच्या औषधी एजन्सी चालकाकडून सात ते आठ हजार रुपये प्रति रेमडेसिविर दराने ही इंजेक्शन विकत आणल्याची कबुली दिली. यानंतर पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल चासकर यांचे पथक तत्काळ त्याला पकडण्यासाठी परभणीला रवाना झाले. आतापर्यंत त्यांनी अनेकांना चढ्या दराने इंजेक्शन विक्री केल्याची माहिती गुन्हे शाखेला दिली.