छत्रपती संभाजीनगर : औद्योगिक उत्पादनांची ने-आण करण्यासाठी रेल्वे, रस्ते मार्गाचा वापर जेवढा महत्त्वपूर्ण असतो, तेवढेच महत्त्व लॉजिस्टिक हब-पार्कला असते. महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण-२०२४ ला बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यात छत्रपती संभाजीनगर-जालना राज्य लॉजिस्टिक हब आणि नांदेड-देगलूर प्रादेशिक लॉजिस्टिक हब उभारण्याची घोषणा करण्यात आली. यातून उद्योगाला मोठा फायदा होणार असून, रोजगार निर्मितीही होईल.
छत्रपती संभाजीनगर-जालना, ठाणे-भिवंडी, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पुणे-पुरंदर आणि पालघर-वाढवण या पाच ठिकाणी प्रत्येकी ५०० एकरवर राज्य लॉजिस्टिक हब तयार होईल. या पाच हबसाठी २,५०० कोटींची तरतूद करण्यात येईल, तर नांदेड-देगलूर, अमरावती-बडनेरा, कोल्हापूर-इचलकरंजी, नाशिक-सिन्नर व धुळे-शिरपूर या पाच ठिकाणी प्रत्येकी ३०० एकरांवर प्रादेशिक हब उभारण्यात येईल. प्रादेशिक लॉजिस्टिक हबच्या विकासासाठी १,५०० कोटींची तरतूद करण्यात येणार आहे.
ऑक्टोबर २०१८ मध्ये केली होती चाचपणीलॉजिस्टिक पार्कची उभारणी दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरच्या (डीएमआयसी) शेंद्रा टप्प्यात करता येईल काय? याबाबत सिंगापूर येथील शिष्टमंडळाने ऑक्टोबर २०१८ मध्ये जागेची पाहणी केली होती.
लॉजिस्टिक हबमध्ये काय सुविधा?लॉजिस्टिक हबची प्रामुख्याने औद्योगिक वसाहतीमध्ये गरज असते. कंपन्यांची उत्पादने ठेवण्यासाठी या पार्कचा उपयोग होतो. साठवणुकीची गोदामे, शीतगृह, मालवाहतूक करणाऱ्या कंपन्यांची कार्यालये, मालवाहतुकीसाठी २४ तास मनुष्यबळ, निर्यातीसाठीच्या सर्व परवानग्या, तसेच विदेशात माल पाठविण्यासाठी आवश्यक असणारी परवानगी मिळविणे ही कंपनीची जबाबदारी आहे. सीमा शुल्क विभाग, बंदरांवरून माल वाहतूक करण्यापूर्वी लागणाऱ्या कागदपत्रांची दुसऱ्यांदा तपासणी होणार नाही. या सुविधा लॉजिस्टिक हबमध्ये असतील. फ्रेट स्टेशन, साठवणूक, वितरण, उत्पादनांचे ग्रेडिंग, कार्गो अशा सुविधा मिळतात. लॉजिस्टिक हबमध्ये ट्रक टर्मिनल्स, कूलिंग, प्लँट, वर्कशॉप, होलसेल मॉल चेन तयार केली जाते. यातून शहरातून होणारी वाहतूक आपसूक कमी होईल. त्यामुळे शहरातील प्रदूषणही कमी होण्यास मदत होते.
मालवाहतुकीचे दर कमी होतीलछत्रपती संभाजीनगर-जालना राज्य लाॅजिस्टिक हब उद्योगासाठी महत्त्वपूर्ण आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल. औद्योगिक मालवाहतुकीचे दर कमी होतील. लवकरात लवकर हे झाले पाहिजे.- चेतन राऊत, अध्यक्ष, मसिआ
फूड प्रोडक्टला सर्वाधिक फायदालाॅजिस्टिक हबने औद्योगिक मालवाहतुकीचा खर्च किमान ५ ते ७ टक्क्यांनी कमी होईल. शेतमाल, फूड प्रोडक्टसाठी याचा सर्वाधिक फायदा होईल. माल लवकर पोहोचेल, त्यातून उत्पादन क्षमता वाढेल.- दुष्यंत पाटील, माजी अध्यक्ष, सीएमआयए