लोकमत न्यूज नेटवर्कबीड : दुपारी दोन वाजण्याची वेळ.. एकच मंडप.. दोन विवाह... एक वरदेव घोड्यावरून मंडपात आला तर दुसरा येणार होता.. अक्षता वाटल्या.. अंतरपाट धरला.. आणि आता शुभमंगल सावधान, असे शब्द पुरोहितांच्या तोंडून निघताच बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी त्यांना थांबविले. यामुळे सर्व मंडप स्तब्ध झाला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे सर्वच अचंबित झाले. अर्धा तासाने एकाचा विवाह पार पडला. परंतु दुसऱ्या नवरदेवाला परण्या निघण्या अगोदरच घरचा रस्ता धरावा लागला. हा सर्व प्रकार बीडमधील कंकालेश्वर मंदिराच्या परिसरात रविवारी घडला. बीड जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून बालविवाह होण्याचा प्रमाण वाढले आहे. गत १५ दिवसांतच १५ विवाह रोखण्यात आले होते. रविवारी पुन्हा एक बालविवाह रोखण्यात बालसंरक्षक अधिकाऱ्यांना यश आले आहे. शहरातील गोविंद नगर भागातील एक जोडपे विवाहबद्ध होत असल्याची तक्रार बालसंरक्षक अधिकारी तत्वशिल कांबळे यांच्याकडे शनिवारी सायंकाळी आली. यामध्ये मुलाचे वय ३० वर्षे असून मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती होती. कांबळे यांनी याची शहानिशा केली असता, हा सर्व प्रकार सत्य असल्याचे उघड झाले. त्यामुळे हा विवाह रोखण्यात आला.दुसऱ्या घटनेत याच मंडपात बीड शहरातील संत नामदेव नगर भागातील मुलगा व गेवराई तालुक्यातील तरटेवाडी येथील मुलीचा विवाह होता. या घटनेतही मुलाचे वय ३० च्या जवळपास होते तर मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती होती.परंतु मुलीच्या नातेवाईकांना याला विरोध करीत मुलगी सज्ञान असल्याचे सांगतले. पुरावे दाखविल्यानंतर पोलिसांसह सामाजिक कार्यकर्त्यांना विश्वास बसला. अगोदर रोखलेला विवाह अर्धा तास उशिराने लागला. पुरोहितांवर गुन्हा नोंदवा- कांबळे, तांगडेकंकालेश्वर मंदिर हा धार्मिक व सार्वजनिक मालमत्तेचा परिसर आहे. येथे विवाह होणे चांगले आहे. परंतु बालविवाह होत असतील तर ते चुकीचे आहे. यापूर्वीही येथे असे बालविवाह झाले आहेत. पुरोहितांनी मुलगा व मुलगी सज्ञान आहेत का? याची खात्री करावी. खात्री न करता एखादा बालविवाह लावला तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी कांबळे व तांगडे यांनी केली.
एकाच मंडपात दोन विवाह; एकाचे शुभमंगल, दुसरा रोखला
By admin | Published: June 19, 2017 12:09 AM