करमाड : हिवरा येथील शेतकरी भरत पोफळे यांच्या मंगरूळ शिवारातील बागेतून बुधवारी रात्री चोरट्यांनी डाळींब तोडून पालायन केले. जवळपास ८० कॅरेट माल चोरीस गेला असून, बाजारभावानुसार त्याची किमत १ लाख ७५ हजार रुपये इतकी आहे.
औरंगाबाद तालुक्यातील हिवरा येथील शेतकरी भरत मारोती पोफळे यांची मंगरूळ शिवारातील गट नं २६३ मध्ये ३२५ झाडांची डाळींब बाग असून, त्याची फळ परिपक्व अवस्थेत आले होते. त्याचा फायदा घेत चोरट्यांनी बुधवारी रात्री डाळींब बागेत शिरून जवळपास ८० कॅरेट डाळिंब चोरून चोरटे पसार झाले. पाऊल खुनांवरून ९ ते १० चोरटे असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
करमाड पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.सध्या डाळींबाला चांगला भाव असून या परिसरात मोठ्या प्रमाणात डाळींब उत्पादक शेतकरी आहे. या परिसरात सातत्याने अशा घटना घटत आहे. मागील आठवड्यात उचलतील येथील शेतकऱ्यांच्या शेतातून डाळींब चोरीला गेले होते. अशा घटनांमुळे डाळींब उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत.