:मुले सुखरुप परतल्याने पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रु
मुले सुखरूप परतल्याने पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू
वाळूज महानगर : रांजणगाव येथील घरातून पळून गेलेली दोन मुले मध्य प्रदेशात रेल्वेत सापडल्यानंतर वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक गुरुवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास उद्योगनगरीत दाखल झाले. दक्ष नागरिक व पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही दोन्ही मुले सुखरूप मिळाल्याने या दोघांना पाहताच त्यांच्या पालकांना आनंदाश्रू आवरेना.
रांजणगाव शेणपुंजी येथील युवराज बाळू काळे (१२) व शिवम राकेश सिंग (१०) हे दोघे २८ ऑगस्टला खेळण्यासाठी जात असल्याचा बहाणा करून घरातून पळून गेले होते. रात्री उशिरापर्यंत युवराज व शिवमचा पालकांनी सर्वत्र शोध घेतला. अखेर मुले बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. दरम्यान, युवराज व शिवम हे ॲपेरिक्षातून रेल्वेस्टेशनला गेले. रेल्वेतून प्रवास करीत असताना हे दोघे थेट मध्य प्रदेशात पोहोचले. रेल्वेत एका सहप्रवाशाने या दोघांची चौकशी केली. तेव्हा घरातून पळून आल्याचे मुलांनी सांगितल्यानंतर त्या सहप्रवाशाने रेल्वे पोलिसांशी संपर्क साधून मुलांना त्यांच्याकडे स्वाधीन केले. मध्य प्रदेशातील गाडरवाडा येथे कर्तव्य बजावणारे उपनिरीक्षक विजय दुबे, सहा. उपनिरीक्षक एस. एस. परस्ती यांनी युवराज व शिवम यांची चौकशी केल्यानंतर त्यांनी एमआयडीसी वाळूज पोलिसांना याबद्दल माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संदीप गुरमे, उपनिरीक्षक चेतन ओगले यांनी सहायक उपनिरीक्षक महाजन व पोकॉ. शेख या दोघांना युवराज व शिवम यांना आणण्यासाठी मध्य प्रदेशाला रवाना केले.
चिमुकले सुखरूप परतल्याने पालकांना आनंदाश्रू
युवराज व शिवम या दोघांना मध्य प्रदेशातून ताब्यात घेतल्यानंतर एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे पथक गुरुवारी मध्यरात्री उद्योगनगरीत पोहचले. यानंतर पोलिसांनी या दोघांच्या पालकांशी संपर्क साधून मुले परतल्याची माहिती दिली. सहा दिवसांपासून नजरेआड झालेल्या या चिमुकल्यांना पाहताच युवराजची आई संगीता, वडील बाळू काळे तसेच शिवम याची आई राजकुमारीदेवी, वडील राकेश सिंग यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.
फोटो ओळ- रांजणगावातून घरातून मध्य प्रदेशात पळून गेलेले युवराज काळे व शिवम सिंग सुखरूप परतल्यानंतर त्यांच्या पालकांना आनंदाश्रू अनावर झाले होते.
फोटो क्रमांक- पालक
------------------------------