छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजताच राजकीय घडामोडींना वेग आला असून मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार सतीश चव्हाण आणि गेवराईचे भाजप आमदार लक्ष्मण पवार हे महायुतीला सोडचिठ्ठी देऊन शरद पवारांची ‘तुतारी’ हाती घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मराठवाड्यात मिळालेल्या यशामुळे महायुतीतील अनेक जण मविआकडून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आ. सतीश चव्हाण (गंगापूर), आ. लक्ष्मण पवार (गेवराई), रमेश आडसकर (माजलगाव), माजी आमदार भीमराव धोंडे (आष्टी) यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. माजी आमदार पृथ्वीराज साठे (केज), तर बीडमधून आ. संदीप क्षीरसागर यांची उमेदवारी देखील शरद पवार यांनी निश्चित केली असल्याचे समजते.
लोकसभा निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव करुन निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) खासदार बजरंग सोनवणे, माजी मंत्री राजेश टोपे आणि नरेंद्र काळे हे बीड जिल्ह्यात मोर्चेबांधणी करत आहेत. लक्ष्मण पवार, रमेश आडसकर, भीमराव धोंडे या महायुतीच्या नेत्यांना मविआत आणण्यात यांनीच मध्यस्थी केल्याचे समजते.
परळीत राजेसाहेब देशमुख!परळीत मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी चाचपणी करण्यात येत असून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांना मैदानात उतरविले जाण्याची शक्यता आहे. देशमुख हे एक-दोन दिवसांत शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. परळी मतदारसंघात देशमुख यांचे खूप ‘सगे-सोयरे’ आहेत.