शिऊर : येथील सफियाबादवाडी शिवारातील एका हॉटेलमध्ये झालेल्या खून प्रकरणात आणखी दोन आरोपींना शिऊर पोलिसांनी सोमवारी (दि.१८) रात्री अटक केली आहे. या प्रकरणातील एकूण चार आरोपींना वैजापूर न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.रविवारी (दि.१७) शिऊरजवळील बंद हॉटेलात एका अज्ञात व्यक्तीची तोंड व हात चिकटपट्टीने घट्ट बांधून कानात गोळी मारून हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. यानंतर काही तासांतच शिऊर पोलिसांनी मृत व्यक्ती ही शिर्डी येथील व्यापारी निशिकांत पांडे असल्याची ओळख पटविली. तसेच शनिशिंगणापूर येथील सी.सी.टी.व्ही. फुटेजवरून पांडे यांच्या दोन मित्रांना संशयित म्हणून ताब्यात घेतले होते. पोलिसांनी कसून चौकशी केली असता दुर्गाप्रसाद मिश्रा व इक्बाल मुसा शेख यांनी खुनाची कबुली दिली. त्यावरून पोलिसांना यात आणखी काही साथीदार असल्याचा संशय असल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागासोबत शिऊर पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा शिर्डी येथून आणखी दोन आरोपी भागीनाथ विश्वनाथ शिंदे (३५) व रसूल आयुब शेख (२५), दोघेही रा. शिर्डी यांना राहत्या घरून ताब्यात घेतले. मंगळवारी (दि.१९) चारही आरोपींना वैजापूर न्यायालयात हजर केले असता त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे .या तपासात पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, सहायक पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली शिऊर पोलीस ठाण्याचे सपोनि. धनंजय फराटे, पो.हे.कॉ. रोहिदास तांदळे, पो.कॉ. ए.एस. मगर, के.बी. रावते, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे फौजदार दीपक सरोदे, पो.कॉ. गणेश मुळे, सागर पाटील यांनी सहभाग घेतला.
आणखी दोघांना अटक
By admin | Published: July 20, 2016 12:02 AM