औरंगाबाद, दि. 14 : जुनाबाजार येथे पूर्ववैमनस्यातून वाहने जाळणा-यास घटनेनंतर अवघ्या काही तासात गुन्हेशाखेने आरोपीस अटक केल्याची घटना ताजी आहे. असे असतानाच शहरातील काजीवाडा येथे समाजकंटकाने दोन दुचाकी जाळल्या. ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी सिटीचौक ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली.
याविषयी अधिक माहिती देताना सिटीचौक पोलिसांनी सांगितले की, काजीवाडा येथील रहिवासी निलेश रत्नाकरराव घुले यांनी बुधवारी रात्री घरासमोर त्यांची मोटारसायकल (क्रमांक एमएच-२० एव्ही ८४४४) उभी करून ठेवली होती. त्यांच्या दुचाकीशेजारी तौसिफ शेख यांची मोटारसायकल (एमएच-२० बीडब्ल्यू ८८६९) उभी होती. मध्यरात्री अज्ञाताने प्रथम निलेश यांची आणि नंतर तौसिफची दुचाकी पेटविली.
या घटनेत निलेश यांच्या दुचाकीची सीट आणि इंजीनने पेट घेतला.यामुळे निघालेल्या धुराने निलेशसह शेजा-यांना जाग आली. त्यांनी पाणी मारून दुचाकीला लागलेली आग विझविली. या घटनेत निलेशची दुचाकी जळून खाक झाली. तर तौसिफ यांच्या दुचाकीचे किरकोळ नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच सिटीचौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक हेमंत कदम आणि कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी निलेश यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली. या गाड्या कोणी आणि का पेटविल्या याबाबतचा तपास पोलिसांनी सुरू केला.