औरंगाबाद : मौजमस्तीसाठी दुचाकी चोरणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून मोठ्या शिताफीने अटक केली. आरोपींनी विविध ठिकाणी मोटारसायकली चोरल्याची कबुली देत लपवून ठेवलेल्या १२ मोटारसायकली पोलिसांच्या हवाली केल्या. या चोरट्यांकडून वाहनचोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता ग्रामीण पोलिसांनी व्यक्त केली.मंगेश भिकनचंद गिरी (रा. भिवधानोरा, ता. गंगापूर) आणि सुमित रामचंद्र राजपूत (रा. सिडको एन-६), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ग्रामीण गुन्हे शाखेच्या अधिकाºयांनी सांगितले की, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गंगापूर तालुक्यात गस्तीवर असताना औरंगाबाद शहरातून चोरलेल्या मोटारसायकली विक्री करण्यासाठी दोन जण ग्रामीण भागात ग्राहक शोधत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अप्पर अधीक्षक डॉ. गणेश गावडे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सुभाष भुजंग, उपनिरीक्षक सचिन कापुरे, पोहेकॉ रतन वारे, सुनील खरात, रमेश अपसनवाड आणि रामेश्वर धापसे यांनी दोन्ही संशयितांना वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचून पकडले. त्यांची कसून चौकशी केली असता आरोपींनी मागील एक वर्षाच्या कालावधीत शहराच्या विविध ठिकाणांहून मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. दुचाकी चोरल्यानंतर त्यावर बनावट क्रमांक टाकून त्यांची विक्री करण्यासाठी ग्राहकांचा शोध घेत असल्याचे सांगितले. दोन्ही आरोपींनी लपवून ठेवलेल्या चोरीच्या विविध कंपन्यांच्या तब्बल १२ मोटारसायकली पोलिसांना काढून दिल्या. या दुचाकींची बाजारातील किंमत सुमारे साडेपाच लाख रुपये असल्याचे ग्रामीण पोलिसांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक सचिन कापुरे यांच्या तक्रारीवरून वाहनावर बनावट क्रमांक टाक ल्याप्रकरणी गंगापूर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
दोन दुचाकी चोरांना ग्रामीण पोलिसांकडून अटक, चोरीच्या १२ मोटारसायकली जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 11:20 PM