छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिल्या यादीत मराठवाड्यातील १६ उमेदवारांची यादी जाहीर केली असून, यामध्ये चार महिलांना संधी देत २५ टक्के उमेदवारी दिली आहे. विद्यमान आमदारांना संधी देत असताना बीड जिल्ह्यातील गेवराई मतदारसंघात मात्र भाजपने उमेदवार घोषित केलेला नाही. दरम्यान, मराठवाड्यात भाजपचा आणखी किमान सहा जागांवर दावा असणार आहे.
मराठवाड्यात पहिल्या यादीत एका ठिकाणचा अपवाद वगळता भाजपने सर्व विद्यमान आमदारांना पुन्हा मैदानात उतरविले आहे. नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघाची जागा अशोकराव चव्हाण हे भाजपकडून राज्यसभेवर निवडून गेल्याने रिक्त होती. या जागी अशोकराव चव्हाण यांची कन्या श्रीजया यांना संधी देण्यात आली आहे. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री मतदारसंघाचे आमदार हरिभाऊ बागडे हे राजस्थानचे राज्यपाल झाल्याने त्या जागी पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या अनुराधा चव्हाण यांना संधी देण्यात आली आहे. पहिल्या यादीत गेवराई मतदारसंघाचा अपवाद वगळता भाजपने उमेदवारीमध्ये कुणालाची डच्चू दिलेला नाही. परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवल्याचे दिसते.
मराठवाड्यातील एकूण ४६ जागांपैकी १६ उमेदवार जाहीर करत असतानाच भाजपचा आणखी किमान सहा जागांवर दावा असणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड मतदारसंघावर भाजप दावा सांगत आहे. लातूर शहर विधानसभा मतदारसंघ २०१९ मध्ये भाजपने लढविल्याने तिथेही भाजपचा दावा असणार आहे. नांदेड जिल्ह्यात चार जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. या जिल्ह्यातील देगलूरमध्ये जितेश अंतापूरकर यांच्यासाठी आणि लोहा मतदारसंघात प्रताप पाटील-चिखलीकर यांच्यासाठी भाजपचा दावा असणार आहे. परभणी शहर मतदारसंघ आपल्याला मिळावा, अशी भाजपच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे.
याशिवाय गंगाखेड मतदारसंघही भाजपला हवा आहे. बीड जिल्ह्यामध्ये गेवराईत लक्ष्मण पवार हे विद्यमान आमदार भाजपचे आहेत. मात्र, तिथली उमेदवारी जाहीर न झाल्याने संभ्रम आहे. आष्टीची जागा भाजपला हवी आहे. यासाठी गेवराईची जागा भाजप मित्रपक्षाला सोडतो की नाही, हे पाहावे लागेल. जालन्यामध्ये तीन विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. जालना शहर आणि घनसावंगीची जागा भाजपला सुटावी, असा हलकासा सूर कार्यकर्त्यांकडून उमटत आहे. मात्र, तिथे दोन जागा शिंदेसेनेला द्याव्या लागणार आहेत. हिंगोलीतील तीन जागांवर महायुतीतील भाजप, शिंदेसेना व राष्ट्रवादी अजित पवार गट, अशा तिन्ही प्रमुख पक्षांचे आमदार आहेत. त्यामुळे तिथे काही बदल होणार नाही.
महिला उमेदवारजिंतूर- मेघना बोर्डीकरकेज- नमिता मुंदडाभोकर- श्रीजया चव्हाणफुलंब्री- अनुराधा चव्हाण