छत्रपती संभाजीनगर : एमआयडीसी सिडको, सातारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरविणाऱ्या दोन कुख्यात गुंडांना एमपीडीए कायद्यातंर्गत हर्सुल कारागृहात वर्षभरासाठी स्थानबद्ध केले आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्या आदेशाने करण्यात आली. अक्षय उर्फ भैय्या रमेश वाहुळ (२२, रा. एकता कॉलनी, सातारा परिसर) आणि शेख इरफान शेख लाल (२७, रा. भारतनगर, गारखेडा गाव) अशी स्थानबद्ध गुंडांची नावे असल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली.
सातारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अक्षय उर्फ भैय्या याने खुनाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी, अतिक्रमण, दादागिरी, शिविगाळ, घातक शस्त्राने जखमी करणे अशा गंभीर स्वरुपाचे १७ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतरही त्याच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढत हाेते. एका शाळेत जाऊन विद्यार्थिनीच्या वडिलांवर जिवघेणा हल्लाही नुकताच त्याने केला. त्याच्या दहशतीमुळे अक्षय यास एमपीडीए कायद्यानुसार स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव सातारा पोलिस व गुन्हे शाखेने तयार केला. त्यानुसार त्यास १० एप्रिल रोजी आयुक्त डॉ. गुप्ता यांच्या मान्यतेने स्थानबद्ध करण्यात आले. एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शेख इरफान शेख लाल यानेही जबरी चोरी, मालमत्ता जबरीने घेणे, आडवून लुटणे, गोडावुन फोडुन चोरी करण्यासह इतर प्रकारचे २१ पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढतच असल्यामुळे हर्सुलमध्ये एमपीडीए कायद्यानुसार स्थानबद्ध केले आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, एम.सिडकोचे गौतम पातारे, साताराचे प्रशांत पोतदार, सहायक निरीक्षक शिवाजी चौरे, उपनिरीक्षक देविदास शेवाळे, सचिन जाधव, आत्माराम घुगे, सहायक उपनिरीक्षक द्वारकादास भांगे, हवालदार महादेव दाणे, दिपाली सोनवणे, सुनील धुळे यांच्या पथकाने केली.
इतर गुन्हेगार रडारवरएम. सिडको हद्दीत महिलेवर सामुहिक अत्याचारानंतर निर्घृण खुनाच्या घटनेतील आरोपी हे कुख्यात गुंड आहेत. त्यामुळे इतरही गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई वेगाने करण्यात येत असल्याची माहिती निरीक्षक आघाव यांनी दिली.