औरंगाबाद: कुळ जमिनीसंदर्भात तहसलीदार यांनी दिलेल्या निर्णयास स्थगिती देण्यासाठी तक्रारदार शेतकºयाकडे ५० हजार रुपये लाचेची मागणी करून स्वीय सहायकामार्फत १० हजार रुपये लाच घेतल्याप्रकरणी सिल्लोडचे उपविभागीय(प्रांताधिकारी)सह दोन जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी सापळा रचून पकडले. ही खळबळजनक कारवाई सिल्लोड येथील प्रांताधिकारी यांच्या कार्यालयात २८ डिसेंबर रोजी दुपारी करण्यात आली.उपविभागीय अधिकारी अनिल गोविंदराव माचेवाड(४२,रा. विटखेडा,औरंगाबाद)आाणि त्यांचे स्वीय सहायक रत्नाकर महादू साखरे(५२,रा. अलका सोसायटी, सिडको एन-९)अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार यांच्या आजोबाच्यानावे वडिलोपार्जित शेती असून त्यांना ती सरंक्षीत कुळत्तने मिळालेली आहे. तक्रारदार यांच्या आजोबाच्यानावे असलेल्या जमिनीबाबत नियमानुसार परवानगी न घेता खोटे खरेदीखत नोंदविण्यात आले होते.याविषयी तक्रारदार यांचे वडिल आणि काकाने दिवाणी कोर्टात केलेल्या दाव्याचा निकाल त्यांच्या बाजूने लागला होता. त्यानंतर संबंधित खोट्या फेरफारला तत्कालीन तहसीलदार यांनी स्थगिती दिली होती.परंतु सदर कुळ जमिनीच्यासंदर्भाने नवीन आदेशाची अंमलबजावणी सुरू झाल्याचे कळताच तक्र ारदार यांनी तहसील कार्यालयात अर्ज दाखल केला आणि उपविभागीय अधिकारी माचेवाड यांच्याकडे अपील दाखल करून तहसीलदार यांच्या कार्यवाहीला स्थगिती देण्याची विनंती केली. या अपीलानुसार तहसीलदार यांच्या कार्यवाहीला स्थगिती देण्यासाठी माचेवाड यांनी त्यांच्या स्वीय सहायक साखरेमार्फत ५० हजार रुपये लाच मागितली. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याविषयी लाचलुपत प्रतिबंधक विभगाकडे तक्रार नोंदविली. यानंतर २८ डिसेंबर रोजी पोलीस उपअधीक्षक वर्षाराणी पाटील, पोलीस निरीक्षक भरत राठोड, सचिन गवळी, विजय ब्राम्हदे, रविंद्र देशमुख, सुनील पाटील, चालक संदीप चिंचोले यांनी उपविभागीय कार्यालयात सापळा रचला. यावेळी पंचासमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली असता माचेवाड यांनी साखरे यांना भेटण्याचे तक्रारदार यांना सांगितले. यावेळी कार्यालयातील झेरॉक्स रूममध्ये तक्रारदाराकडून लाचेचे दहा हजार रुपये साखरे यांनी घेतले. आरोपीने लाच घेताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी साखरे यांना लाचेच्या रक्कमेसह रंगेहात अटक केली. याप्रकरणी उपविभागीय अधिकारी माचेवाड आणि त्यांचे स्वीय सहायक साखरे यांना लगेच ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरोधात सिल्लोड शहर ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
सिल्लोडच्या प्रांताधिका-यासह दोन जण लाचेच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 12:19 AM