औरंगाबाद: नशेखोरांना गुंगी आणणा-या औषधांची बेकायदा विक्री करणा-या विरोधात पोलिसांनी मोहिम उघडली आहे. विनापरवाना गुंगीच्या औषधाचा साठा करणा-या दोन जणांना सिटीचौक पोलिसांनी मंजूरपुरा येथे ७ नोव्हेंबर रोजी पकडले. त्यांच्याकडून रोख रक्कमेसह औषधांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
आवेज खान मेहेबुब खान (२५,रा.मंजूरपुरा) आणि शेख कलीम उर्फ छोटू शेख कादर(२४,रा. लोटाकारंजा)अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, जुन्या शहरातील तरूणांना नशेचे व्यसन लागले आहे. मद्य प्राशन केले तर त्याच्या वासाने तो नशेत असल्याचे समोरच्या व्यक्तीच्या लगेच निदर्शनास येते. यावर पर्याय म्हणून नशेखोरांनी व्हाईटनरसह विविध प्रकारचे केमिकल,नशेच्या गोळ्या खाण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे नशेच्या गोळ्या विक्री करण्यासंदर्भात शासनाने नियमावली घालून दिलेली आहे. यानुसार अधिकृत मेडिकल स्टोअरमध्येच या गोळ्या विक्रीसाठी ठेवता येतात. एवढेच नव्हे तर डॉक्टरांच्या प्रिस्क्रीपशनशिवाय गुंगी येणारी औषधी विक्री करता येत नाही. ज्या रुग्णांना या गोळ्या विक्री करण्यात आल्या आहेत त्यांचे नाव आणि पत्ता लिहून ठेवणे मेडिकल स्टोअरवरील फार्मासिस्टला बंधनकारक आहे.
असे असताना काही जण गुंगी आणण्याची औषधी बेकायदा विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे, पोलीस निरीक्षक हेमंत कदम, पोलीस उपनिररीक्षक नागरे, अन्न व औषधी प्रशासन विभागाचे निरीक्षक राजगोपाल बजाज, माधव निमसे,मोहम्मद अझहर, पोलीस कर्मचारी शेख गफ्फार, सचिन शिंदे आदी कर्मचा-यांनी आवेज खान व शेख कलीम यांच्या घरावर छापा मारला. या छाप्यात त्यांच्या घरून अवैधरित्या साठवलेली गुंगी येणा-या गोळ्यांची १६२ पाकिटे व ३० औषधी बाटल्या, तीन मोबाईल व रोख ११ हजार २००रुपये असा सुमारे २५ हजार ९६० रुपयांचा ऐवज मिळाला. याप्रकरणी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात सिटीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.