पैठण : पैठण येथील जिल्हा खुल्या कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या दोन कैद्यांनी कारागृहातून शनिवारी रात्रीच्या सुमारास पलायन केले. रविवारी दिवसभर कारागृह प्रशासनाने परिसरात त्यांचा शोध घेतला, परंतु ते न सापडल्याने रविवारी कारागृह प्रशासनाने पैठण पोलीस ठाण्यात कैदी फरार झाल्याची फिर्याद दिली.पैठण येथील खुल्या कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या व ज्यांची वर्तणूक चांगली आहे, अशा कैद्यांना शिक्षेच्या अंतिम टप्प्यात ठेवले जाते. या कारागृहात कैद्यांकडून शेतीची कामे करून घेतली जातात. बंदिस्त जीवन या कारागृहात नसते. दरम्यान, शनिवारी शेतीच्या कामावर गेलेले कैदी जावेद रिझवान शेख (३१, रा. कोंडवा कमला झोपडपट्टी पुणे) व व्यंकटी बालाजी जाधव (३०, रा. कुदळा. ता उंबरी जि. नांदेड) हे दोन कैदी रात्रीच्या हजेरीस गैरहजर आढळून आले. कारागृह परिसरात त्यांचा शोध घेण्यात आला, परंतु ते आढळून आले नाही. कारागृहातून त्यांनी पलायन केल्याचे स्पष्ट झाल्याने आज कारागृहाचे शिपाई अनिल महादेव घुले यांनी पैठण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलीस निरीक्षक चंदन इमले यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार राजू शेख हे पुढील तपास करीत आहेत.
पैठण कारागृहातून दोन कैदी पळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 12:12 AM