- बापू सोळुंके
औरंगाबाद : गर्भवती हरणाची शिकार करून मांस विक्री करण्याच्या उद्देशाने त्याचे शरिराचे तुकडे-तुकडे करणार्या दोन भावांना एमआयडीसी सिडको पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. ही कारवाई आज दुपारी ११ वाजेच्या सुमारास नारेगाव येथे पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे आणि त्यांच्या पथकाने केली.
शेख असिफ शेख चांद(२२) आणि शेख साजीद शेख चांद (२०,दोघे रा. माणिकनगर,नारेगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती अशी की, असिफ हा व्यवसायाने रिक्षाचालक आहे. आज पहाटे ५.३० च्या सुमारास तो करमाड येथे रिक्षा घेऊन गेला होता. करमाडकडून शहराकडे येत असताना त्यास रस्त्याच्या बाजुला एक जखमी हरीण पडलेली दिसली. या हरणाला त्याने उचलून रिक्षात टाक ून गुपचूप माणिकनगर येथील घरी नेले. तेथे त्याचा लहान भाऊ शेख साजीद याच्या मदतीने त्यांनी हरणाचे मांस विक्री करण्याचा निर्णय घेतला. हरणाला त्यांनी कापल्यानंतर त्याच्या पोटातून एक मृत पाडस बाहेर पडलं. या हरणाच्या मासांला दिड ते दोन हजार रुपये प्रति किलो असा चोरट्या मार्गाने मागणी असते, अशी माहिती आरोपींना होती. यामुळे त्यांनी काही लोकांशी संपर्क साधून हरणाचे मांस हवे आहे का याविषयी विचारणा केली.
दरम्यान हरणाला रिक्षातून घरात नेताना पाहिलेल्या एका नागरिकाने पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांना फोन करून या घटनेची माहिती दिली. पोलीस निरीक्षक माळाळे, उपनिरीक्षक सिताराम केदारे, कर्मचारी देविदास साबळे, विक्रम वाघ, सोनवणे आणि ढगे यांनी लगेच आरोपीच्या घरावर धाड मारली. यावेळी आरोपी हे हरिणाची कातडी सोलत होते. पोलिसांना पाहुन ते पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले ,मात्र पोलिसांची संख्या अधिक असल्याने त्यांना ते शक्य झाले नाही. यावेळी घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी मृत हरिण आणि त्याच्या पाडसाचे प्रेत ताब्यात घेतले आणि आरोपींना बेड्या ठोकल्या. या घटनेची माहिती फॉरेस्ट विभागाच्या अधिकार्यांना देण्यात आली.