करमाड (औरंगाबाद) : शेतातील घराशेजारी असणाऱ्या शेततळ्यात कंपास तो काढण्यासाठी गेलेल्या दोन संख्या भावंडाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दोघे भाऊ एका नऊ व एका अकरा वर्षाचे होते. ही मनाला हेलवणारी घटना औरंगाबाद तालुक्यातील दरकवाडी या गावात सोमवारी (ता. पाच) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. करमाड पोलीस ठाण्याचे पोनीमुरलीधर खोकले यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन सविस्तर चौकशी केली.
अजिंक्य धनंजय वाघ (11) व पार्थ धनंजय वाघ (वय नऊ, दोघेही राहणार दरकवाडी ता. औरंगाबाद) असे या घटनेत मृत पावलेल्या दोन्ही भावंडांची नावे आहेत. याबाबत, अधिक माहिती अशी की, धनंजय वाघ यांची गावाशेजारी शेती आहे. त्यामुळे ते कुटुंबासह शेतातच राहतात. नेहमीप्रमाणे अजिंक्य व पार्थ घरा शेजारी खेळत होते. खेळत शेजारी असणाऱ्या शेततळ्याकडे गेले असता कंपासपेटी पाण्यात पडली. ती काढण्यासाठी ही भावंडे पाण्यात उतरली. यावेळी बुडून त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांमार्फत देण्यात आली.
सगळीकडे गणपती व गौरी सणाची लगबग सुरू असल्याने हे कधी व कसे झाले कोणालाच लवकर कळले नाही. दरम्यान, बराच वेळ झाला तरी मुलांचा आवाज नाही, ते दिसत नसल्याचे पाहून आईने मुलांच्या वडिलांना विचारले. तेंव्हा शोधाशोध सुरू झाली. यावेळी शेततळ्यात अजिंक्यचा मृतदेह तरंगत असताना आढळून आला. आणखी शोधाशोध सुरू असताना पार्थचाही मृतदेह मिळून आला. वाघ दाम्पत्यांना ही दोनच अपत्य होती. यातील अजिंक्य हा इयत्ता सहावी तर पार्थ हा चौथ्या वर्गात शिकत होता. या घटनेची करमाड पोलीस ठाण्यात अकस्मात मूर्तीची नोंद घेण्यात आली.