कन्नड : तालुक्यातील खामगाव येथील खारी नदी पात्रात बुडून दोन बहिणींचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेसहा वाजेदरम्यान घडली. आरती कैलास कवडे (२२) आणि ऋतुजा शिवाजी कवडे (१८) अशी मृत चुलत बहिणींची नावे आहेत. त्या दोघी आजी आणि वहिनीसोबत अधिक मासानिमीत्त महादेवाच्या मंदीरात दर्शनासाठी जात होत्या.
याबाबत अधिक माहिती अशी की, खामगाव येथील खारी नदीच्या जवळ महादेवाचे मंदिर आहे. भाविक अधिक मासानिम्मित येथे पूजा करतात. येथे दर्शनासाठी जाण्यास गावातील आरती कैलास कवडे (२२) आणि ऋतुजा शिवाजी कवडे (१८) या चुलत बहिणी आजी आणि वाहिनीसोबत सकाळी ६ वाजता गावातून निघाल्या. यावेळी नदीत स्नान करून देवदर्शन घ्यावे म्हणून त्या नदी पात्रात उतरल्या. नदीला जास्त पाणी नाही. मात्र, नदीत ठिकठिकाणी मोठे खड्डे झाले आहेत. यातील एका खड्ड्यात पाय घसरून आरती बुडाली. तिला वाचविण्यासाठी श्रतुजाने धाव घेतली असता ती सुद्धा खड्ड्यात बुडाली यातच दोघींचा मृत्यू झाला.