- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : ‘ या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे...’ या ओळी स्वत:वर निस्सीम प्रेम करायला शिकतात. आपल्याला जसे बनवले आहे, तसे राहण्याचा अन् जगण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करीत असतो. तेलंगणा येथील दोन बहिणी लहानपणापासून सर्वसामान्य मुलींप्रमाणेच वाढल्या. मात्र, वयात आल्यानंतर अचानक शरिरात पुरुषांप्रमाणे बदल जाणवण्यास सुरुवात झाली. त्यामुळे मैत्रींमध्ये मिसळताही येत नव्हते. परंतु औरंगाबादेत या दोघी बहिणींवर अनुक्रमे वयाच्या २६ आणि २१ व्या वर्षी लिंग बदलाची शस्त्रक्रिया झाली अन् त्यांना स्त्रीत्व मिळाले.
या दोन्ही बहिणी अत्यंत दुर्मिळ असा ‘फॅमीलीयल स्वायर सिंड्रोम’ या आजाराने ग्रस्त होत्या. लिंगसंभ्रम या प्रकारातील हा आजार क्वचितच आढळतो. संपूर्ण भारतात अशा ७० रुग्णांची नोंद झालेली आहे. या आजारात रुग्णाचा गुणसूत्र पुरुषांप्रमाणे असतो. मात्र, त्यांचा जन्म आणि वाढ ही मुलींप्रमाणे होते. १६ ते १७ वर्षांपर्यंत मासिक पाळी न आल्याने, स्तनांची वाढ न झाल्याने रुग्णांची कोंडी होते. रुग्णाचे अंडकोष निष्क्रीय असतात. या अंडकोषांना आहे तसेच ठेवल्यास ‘गोनॅडोब्लास्टोमा’ हा अंडकोषाचा कर्करोग होण्याचा धोका असतो. या सगळ्या परिस्थितीला या दोन्ही बहिणी सामोरे जात होत्या.
तेलंगणा येथील वरंगल गावातील सर्वसामान्य कुटुंबातील या दोन्ही बहिणी. वडील शेतमजूर. अशा परिस्थितीत लहानपणापासून त्या सर्वसामान्य मुलींप्रमाणे वाढ झाली. एकीचे शिक्षण एम. एस्सी. नर्सिंग आणि दुसरीचे बारावीपर्यंत. परंतु वयात आल्यानंतर शरीरात काहीतरी वेगळे घडत असल्याची जाणीव त्यांना झाली. मासिक पाळी येत नव्हती. आवाज घोगरा होत होता. पुरुषांप्रमाणे शरीरात बदल होत होता. त्यामुळे मैत्रींमध्ये मिसळता येत नव्हते. त्यामुळे एकटेपणा जानवत असे. परंतु या सगळ्यातून त्यांनी स्वत:चा मार्ग काढण्याचा निर्णय घेतला. सोशल मिडियाच्या माध्यमातून त्यांनी शोध घेतला आणि उपचारासाठी थेट औरंगाबाद गाठले. येथे एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर जटील शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्यांना 'स्त्रीत्व' मिळाले.
खचून जाऊ नयेपूर्वी मैत्रींमध्ये मिसळता येत नव्हेत. त्यामुळे वाईट वाटायचे. परंतु शस्त्रक्रियेनंतर आता खूप आनंद वाटत आहे. यापुणे सर्वसामान्य महिलांप्रमाणे आयुष्य जगता येईल. आमच्याप्रमाणे समस्येला सामोरे जाणाऱ्यांनी खचून जाऊ नये, असे या बहिणी म्हणाल्या.