औरंगाबाद : एसटी महामंडळाच्या वातानुकूलित सेमीस्लीपर शिवशाही बससह आता शयनयान (स्लीपर) बस प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्यासाठी सज्ज झाली आहे. औरंगाबाद विभागासाठी शनिवारी दोन वातानुकूलित स्लीपर बस दाखल झाल्या आहेत. या बस प्रारंभी कोल्हापूर आणि नंतर पणजी मार्गावर चालविण्यात येतील,अशी माहिती आगार व्यस्थापक स्वप्नील धनाड यांनी दिली.
खाजगी बससेवेला टक्कर देण्यासाठी एस.टी. महामंडळाने कात टाकायचे ठरविले आहे. राज्यभरात शिवशाही बस घेण्यात येत आहेत. औरंगाबादेत पुण्यासाठी एसटी महामंडळाची आजघडीला शिवनेरी बसची सेवा सुरू आहे. त्यास प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळतो. औरंगाबाद विभागाला अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शिवशाही बस दाखल झाल्या. एकट्या मध्यवर्ती बसस्थानकात गेल्या चार महिन्यांत शिवशाही बसची संख्या १७ वर पोहोचली आहे. मुंबई, कोल्हापूर, नाशिक अशा विविध मार्गांवर या बसेस धावत असून, त्यास प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ट्रॅव्हल्सच्या स्पर्धेत टिकण्यासाठी स्लीपर बसही दाखल झाली आहे. परमीट मिळताच गोव्यासाठी बस चालू करण्यात येणार आहे. या बसद्वारे किफायशीर दरात प्रवाशांना शयनयान सेवा मिळणार आहे.