औरंगाबाद : चरसच्या गोळ्या घेऊन जाणाऱ्या दोन तस्करांना मंगळवारी सायंकाळी पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने सापळा रचून अटक केली. आरोपींकडून चरसच्या तब्बल १९५ गोळ्या, दुचाकी, मोबाईल आणि दोन चिलीम असा सुमारे १ लाख ५ हजाराचा माल जप्त केला.
दोन महिन्यापूर्वी कोकणवाडी येथे मॅफेड्रोनची कारमधून तस्करी करणाऱ्या आरोपींना विशेष पथकाने पकडले होते. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांना ही माहिती मिळाली. पोलिसांनी शहीद भगतसिंग चौकात सापळा रचून संशयित दुचाकीस्वार आरोपी बाबू खान इसाक खान (५२, रा. उस्मानपुरा) आणि मोहम्मद रशीद मोहम्मद हसन (५४, रा . खुलताबाद) यांना पकडले.
आरोपीकडे पिशवीत १३१ . ६० मिली ग्रॅम चरसच्या १९५ गोळ्या आढळल्या. या दोन चिलीम आणि मोबाईल पोलिसांनी जप्त केले. छावणी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल रोडे, कर्मचारी आर. बी. बनकर, इमरान पठाण, तौसिफ खान, अनिल खरात, विठ्ठल आडे, विजय निकम, परशुराम सोनवणे, सय्यद शकील आणि विनोद पवार यांनी केली.