औरंगाबाद : शहरापासून १८ किलोमीटर अंतरावरील लिंबेजळगाव येथे आयोजित इज्तेमासाठी रेल्वे प्रशासनाकडून गुलबर्गा -औरंगाबाद - गुलबर्गा आणि सीएसटी मुंबई - औरंगाबाद - सीएसटी मुंबई अशा दोन विशेष रेल्वे चालविण्यात येणार आहेत. तसेच एसटी महामंडळातर्फे जादा बसचे नियोजन केले आहे.
गुलबर्गा-औरंगाबाद ही रेल्वे गुलबर्गा येथून २३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.५५ वाजता सुटेल. सोलापूर, लातूर, परभणी मार्गे ही रेल्वे २४ फे ब्रुवारीला पहाटे ४ वाजता औरंगाबादला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही रेल्वे औरंगाबादहून २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुटेल आणि २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजता गुलबर्गा येथे पोहोचेल.
सीएसटी मुंबई-औरंगाबाद ही रेल्वे सीएसटी मुंबई येथून शुक्रवारी मध्यरात्री १२.२० वाजता सुटेल. मनमाड मार्गे ही रेल्वे २४ फेब्रुवारीला सकाळी ८.३० वाजता औरंगाबादला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही रेल्वे औरंगाबादहून २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.५० वाजता सुटेल आणि सीएसटी मुंबई येथे २७ फेब्रुवारी रोजी पहाटे ४.२० वाजता पोहोचेल, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागातर्फे देण्यात आली.
दररोज ७२ बसएसटी महामंडळातर्फे २३ ते २६ फेब्रुवारीदरम्यान लिंबेजळगावसाठी दररोज ७२ बस सोडण्यात येणार आहेत. हर्सूल, चिकलठाणा, शहागंज, रेल्वेस्टेशन, देवळाई चौक, मध्यवर्ती बसस्थानक आणि सिडको बसस्थानकातून जादा बस सोडण्यात येणार आहे,अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी संदीप रायलवार यांनी दिली.