औरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यांच्या (स्थापत्य) ११ पदांसाठी रविवारी घेण्यात आलेल्या परीक्षेत बैठक व्यवस्थेवरून गोंधळ उडाला. एकाच बाकावर दोघांना बसविण्यात आल्याने परीक्षेच्या पारदर्शकतेवरच उमेदवारांनी आक्षेप घेतला. मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी स्वत: उमेदवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या गोंधळामुळे अनेक उमेदवार मनपाच्या नोकरभरतीवर बहिष्कार टाकून परीक्षा न देताच केंद्रावरून बाहेर पडले.
महापालिकेची १९९४ सालानंतर नोकरभरती झालेली नाही. जवळपास साडेसहाशे पदे रिक्त आहेत. अधिकारी-कर्मचाऱ्यांअभावी महापालिकेवर कामाचा भार वाढत आहे. त्यामुळे मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी नोकरभरतीची प्रक्रिया सुरू केली. पहिल्या टप्प्यात कनिष्ठ अभियंत्यांची ११ पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी ११ फेब्रुवारी रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. कोणी अर्ज केले आहेत, हे कळू नये आणि नोकरभरती पारदर्शकपणे होण्यासाठी उमेदवारांना थेट लेखी परीक्षेसाठी कागदपत्रांसह रविवारी सकाळी ११ ते १२ यावेळेत देवगिरी कनिष्ठ महाविद्यालयात हजर राहण्याची सूचना करण्यात आली होती.
राज्यभरातील विविध भागांतून उमेदवार सकाळी ११ ते १२ या वेळेत देवगिरी महाविद्यालयात दाखल झाले. प्रारंभी त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर लेखी परीक्षेसाठी उमेदवारांना वर्गात बसविण्यात आले. याठिकाणी वर्गात बसल्यानंतर परीक्षेचे नियोजन पाहून उमेदवारांना धक्काच बसला. याठिकाणचे बाक अतिशय छोटे होते. एकाच बाकावर दोन जणांना बसविण्यात आले. त्यामुळे उमेदवारांनी बैठक व्यवस्थेवर आक्षेप घेऊन एका बाकावर एकच उमेदवार बसविण्याची मागणी केली. मनपाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी बराच वेळ त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु कोणीही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते.यासंदर्भात माहिती मिळताच डॉ. निपुण विनायक यांनी धाव घेऊन उमेदवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ चर्चा केल्यानंतरही एकाच बाकावर दोघांनी बसून परीक्षा देण्यास उमेदवारांनी नकार दिला. या गोंधळामुळे अशा पद्धतीने परीक्षा देणे नको म्हणून अनेक उमेदवार परीक्षा केंद्रातून बाहेर पडले.
पारदर्शकतेवर शंकागोंधळ होत असलेल्या काही वर्गातील उमेदवारांची अन्य वर्गात बैठक व्यवस्था करण्यात आली. यात बराच वेळ गेला. अखेर दुपारी १.४५ वाजता परीक्षेला सुरुवात झाली. जशी व्यवस्था आहे, तशातच २ हजार ९३ उमेदवारांनी परीक्षा दिली. परीक्षा देऊन बाहेर पडलेल्या उमेदवारांनी परीक्षेच्या नियोजनाविषयी नाराजी व संताप व्यक्त केला. मनपाचे नियोजन चुकले, परीक्षेच्या पारदर्शकतेवर शंका वाटते. ५ वर्षांपासून भरतीसाठी प्रयत्न करतो, अशा परीक्षा होतील, तर आमचे काय होणार, असा सवाल त्यांनी केला.
प्रश्न क्रमांक ८७ साठी सर्वांना गुणमनपाच्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकेतही घोळ झाल्याचे दिसते. परीक्षेनंतर मनपाने संकेतस्थळावर ‘अन्सर की’ अपलोड केली. यात प्रश्न क्रमांक ८७ साठी सर्वांना गुण देण्यात येत असल्याची सूचना लिहिण्यात आली होती.
पुढील नियोजनाचा धडानेमके किती उमेदवार परीक्षा देतील, याचा अंदाज नव्हता. तरीही काही वर्गातच उमेदवारांची गैरसोय झाली. बसण्यावरून काही उमेदवारांचा आक्षेप होता. परंतु परीक्षेत बाजूला बसले तरीही कोणी एकमेकांना काही दाखवीत नसतो. थोडा त्रास झाला असला तरी ९० टक्के यशस्वी ठरलो आहोत. यातून पुढील काळातील नियोजनासंदर्भातही एकप्रकारे शिकता आले. सोमवारपर्यंत उमेदवारांची निवड जाहीर करण्याचा प्रयत्न आहे.- डॉ. निपुण विनायक, आयुक्त मनपा