औरंगाबाद : औद्योगिक मिटरचे व्यवसायिक मिटरमध्ये बदल करून देण्यासाठी ४० हजार रुपयांची तर सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षणातून सवलतीसाठी २ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या वर्ग तीनच्या अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. या प्रकरणात करमाड, वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती एसीबीचे उपअधिक्षक मारुती पंडित यांनी दिली.
शेंद्रा एमआयडीसीतील एसबीईबीचा तंत्रज्ञ अनिल आसाराम गरंडवाल (३२) याने तक्रारदाराचे औद्योगिक मीटरचे व्यवसायिक मिटरमध्ये दबल करून देण्यासाठी व कोणतीही कारवाई न करण्यासाठी ६० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. यात तडजोड होऊन ४० हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे तक्रारदारने एसीबीकडे धाव घेतली. त्यानुसार निरीक्षक अनिता इटुबोने यांच्या पथकाने तक्रारीची शहनिशा केल्यानंतर सापळा रचून गरंडवाल यास ४० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. दुसरी कारवाई सार्वजनिक बांधकाम विभागात करण्यात आली. बांधकाम विभागातील लिपिक सिमा दिनकर पवार (४७) हिने सहकाऱ्यास चार महिन्यापर्यंत सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षणासाठी पंधरा दिवस सवलत देण्यासाठी २ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याविषयीची तक्रार एसीबीकडे करण्यात आल्यानंतर उपअधिक्षक दिलीप साबळे यांच्या पथकाने सापळा रचून सिमा पवार हिस लाच घेताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
यांनी केला सापळा यशस्वीएसीबीने गुरुवारी दोन ठिकाणी लाचखोरांना सापळा लावून रंगेहाथ पकडले. यात अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर अधीक्षक विशाल खांबे, उपअधिक्षक मारुती पंडित यांच्या मार्गदर्शात उपअधिक्षक दिलीप साबळे, निरीक्षक अनिता इटुबोने, संदीप राजपुत, हनुमंत वारे, अंमलदार राजेंद्र जोशी, दिगांबर पाठक, शिरीष वाघ, अशोक नागरगोजे, भिमराव जावडे, बाळासाहेब थोरात, पुष्पा दराडे, चंद्रकांत शिंदे, देवसिंग ठाकुर आणि चांगदेव बागुल यांच्या पथकाने केली.