औरंगाबाद : पैशाचा पाऊस पाडण्याच्या आमिषाने साला-मेहुण्याने तीनजणांना तब्बल ११ लाख ६२ हजार रुपयांना गंडा घातला. या पूजा साहित्यासाठी ९० हजार रुपये घेण्यास आलेल्या तीनजणांना गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्याची माहिती निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली.
जावेद खान नूर खान (रा. प्रिया कॉलनी, पडेगाव) यांनी क्रांती चौक ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, पुष्पा ऊर्फ रत्नदीप बाळसो गाडेकर आणि महेश ऊर्फ शोधन प्रसाद निपाणीकर (दोघे रा. मापसा, गोवा) हे दोघेजण त्याच्या ओळखीचे आहेत. त्यातील पुष्पास जावेद यांनी बहीण मानले आहे. १५ जून रोजी दोघेजण जावेदच्या घरी आले. तेथे त्यांची आरोपी प्रमोद दीपक कांबळे (रा. बौद्धनगर, जवाहर कॉलनी) याच्यासोबत ओळख झाली. कांबळे याने ओळखीचा एक मांत्रिक असून, तो पैशाचा पाऊस पाडून दुप्पट पैसे करून देतो, असे सांगून त्या मांत्रिकाची भेट घडविण्यासाठी ५ हजार रुपयांची मागणी केली. कांबळेला पैसे दिल्यानंतर त्याने मांत्रिक कैलास रामदास सांळुके (२५, रा. वाळूज) याची दुसऱ्याच दिवशी ओळख करून दिली.
मांत्रिक साळुंके याने पैशाचा पाऊस पाडण्यासाठी विधिवत पूजा करण्याचा सल्ला दिला. पूजेत बोकड लागेल, असे सांगितले. त्यासाठी ७ हजार रुपये घेतले. तसेच पूजेसाठी जावेद खान यांनी २ लाख, पुष्पा गाडेकर यांनी ५ लाख ९० हजार आणि शोधन निपाणीकर यांनी ३ लाख ६० हजार रुपये रोख व फोन पेद्वारे मांत्रिकाला दिले. या पैशातून पूजेसाठी सोन्याचा मुंजा व इतर साहित्य खरेदी करावी लागेल, असे मांत्रिकाचे म्हणणे होते. त्यापूर्वी मांत्रिकाने शेकटा येथे त्याच्या नातेवाइकाच्या घराशेजारी पूजा मांडून पैशाच्या गोण्यांचे बंडल दाखवले. मांत्रिकाच्या बहिणीच्या शिर्डी येथील घरीही अंधारात पैशाचा पाऊस दाखविला. त्यामुळे तिघांचा त्याच्यावर विश्वास बसला होता. पैसे मिळाल्यानंतर सतत काही दिवसांतच पैशाचा पाऊस पाडून दुप्पट पैसे करून देतो, असे आमिष तो दाखवित होता.
पूजेसाठी पुन्हा पैसे मागितले अन् अडकलेमांत्रिक कैलास सांळुके याने पूजेसाठी आणखी ९० हजार रुपये लागतील, असे सांगून गोव्याच्या दोघांना औरंगाबादेत बोलावले. तेव्हा हा मांत्रिक फसवणूक करीत असल्याचे लक्षात आल्यामुळे पुष्पा गाडेकर व शोधन निपाणीकर यांनी सहायक आयुक्त विशाल ढुमे यांची भेट घेऊन तक्रार केली. त्यानंतर ढुमे यांनी गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अमोल म्हस्के यांच्या पथकास पाठवून कार्तिक हॉटेलमध्ये थांबलेला मांत्रिक साळुंके, त्याचा मेहुणा गोरख पवार आणि प्रमोद कांबळे यांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून रोख पैशासह १ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कामगिरी सहायक आयुक्त ढुमे, पो.नि. आघाव यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक म्हस्के, सहायक फाैजदार सतीश जाधव, जितेंद्र ठाकूर, राजेंद्र गुजराती, संजय राजपुत, मच्छिंद्र जाधव, मनीष सूर्यवंशी, नवनाथ खांडेकर, विठ्ठल सुरे आणि ज्ञानेश्वर जाधव यांच्या पथकाने केली. अधिक तपास उपनिरीक्षक छोटुराव ठुबे करीत आहेत.