औरंगाबाद : रोशनगेट परिसरातील मोबाईल शॉपीचे शटर उचकटून गल्ल्यातील १२ हजारांची रोकड पळविणाऱ्या दोन चोरट्यांना जिंसी पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. सय्यद अली सय्यद मंतू (वय २६, रा. शरीफ कॉलनी) आणि शेख इमरान शेख लुकमान (३५,रा. बाबर कॉलनी) अशी चोरट्यांची नावे आहेत.
मोहम्मद इम्तियाज मोहम्मद सिद्दिकी (रा. इंदिरानगर, बायजीपुरा) यांची रोशन गेट येथे मोबाईल शॉपी आहे. मंगळवारी (दि. १६) रात्री दुकान बंद करून ते घरी गेले. यानंतर चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. दुकानाच्या गल्ल्यातील रोख १२ हजार रुपये चोरून ते पसार झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी मोहम्मद यांना दुकानाचे शटर अर्धवट उघडे दिसले. त्यांनी जिंसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून गुन्हा नोंदविला. पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार विजय जाधव, कर्मचारी अयुब पठाण, संपत राठोड, संजय गावंडे, संतोष बमनावत यांच्या पथकाने तपास केला असता दोन्ही आरोपी घटनास्थळाजवळील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे आढळून आले. यानंतर त्यांचा शोध घेतला असता खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पोलीस दोन्ही आरोपींपर्यंत पोहोचले. रात्री दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.
दारूसाठी फोडले दुकान
आरोपीनी पोलिसांकडे गुन्ह्याची कबुली देताना त्यांना दारूचे व्यसन आहे. दारू पिण्यासाठी पैसे नसल्यामुळे साथीदाराला सोबत घेऊन ही चोरी केल्याचे आरोपी सय्यद अली याने सांगितले. दोन्ही ही आरोपी मजूर असल्याचे पोलिसांनी सांगितले.