औरंगाबाद : मौजमजेसाठी शहराच्या वेगवेगळ्या भागातून किमती मोटारसायकली पळविणाºया दोन अट्टल चोरट्यांना बेगमपुरा पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. या चोरट्यांकडून दहा लाख रुपये किमतीच्या तब्बल दहा मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
शेख शाहरुख शेख रहीम (२२, रा. किराडपुरा, मूळ रा. पाचपीरवाडी, जि. अहमदनगर) आणि कृष्णा बाबासाहेब गुंड (२३, रा. आरणगाव, ता.जि. अहमदनगर) अशी या चोरट्यांची नावे आहेत. याविषयी बेगमपुरा पोलिसांनी सांगितले की, आसेफिया कॉलनीतील रहिवासी मोहम्मद कैसरोद्दीन नसिरोद्दीन सिद्दीकी (५२) यांची मोटारसायकल १८ नोव्हेंबर रोजी रात्री चोरीला गेली होती. याविषयी त्यांनी २० रोजी बेगमपुरा ठाण्यात तक्रार नोंदविली होती. पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, सहायक आयुक्त हनुमंत भापकर, पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रमोद देवकते, कर्मचारी शेख हैदर, रामधन उटाडे, शरद नजन, नामदेव सानप, नागेश पांडे, ज्ञानेश्वर ठाकूर यांच्या पथकाने तपास सुरू केला. तेव्हा ही मोटारसायकलची चोरी शेख शाहरुखने केल्याची माहिती खबºयाने पथकाला दिली.
पोलिसांनी किराडपुरा येथील त्याच्या घरातून संशयित म्हणून शाहरुखला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि ठाण्यात आणले. चौकशीदरम्यान तो पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने तोंड उघडले आणि साथीदार कृष्णा याच्या मदतीने मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली. ही मोटारसायकल त्याने एका ठिकाणी लपवून ठेवल्याचे सांगितले. नंतर पोलिसांनी तक्रारदार यांची मोटारसायकल जप्त केली. अधिक चौकशीअंती त्याने जिन्सी, सातारा, क्रांतीचौक आणि बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बुलेट आणि २२० सीसी क्षमतेच्या नव्या पल्सर मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी कृष्णाला अटक करून आणले. दोघांची समोरासमोर चौकशी केल्यांनतर चोरलेल्या मोटारसायकली त्याने जालना, अहमदनगर, नेवासा आणि चाळीसगाव येथे विक्री केल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी संबंधित ठिकाणी जाऊन चोरीच्या मोटारसायकली खरेदी करणाºयांकडून दुचाकी हस्तगत केल्या.