गुणवत्तेसाठी पालक आग्रही : निर्णय शैक्षणिक नुकसान करणारा
औरंगाबाद : पाल्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सीबीएसई शाळांचा आग्रह धरणाऱ्या पालकांची सीबीएसई बोर्डाकडून निराशा झाली आहे. दहावीची परीक्षा न देताच उत्तीर्ण केल्याने पालकांत यामुळे अस्वस्थता आहे. ऑनलाइन अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत कोणत्या गुणवत्तेवर प्रवेश मिळणार, असा प्रश्न पालकांतून उपस्थित होत आहे.
जिल्ह्यात सीबीएसईच्या ४८ शाळा आहेत. त्यात २८०० विद्यार्थी दहावीत तर २१ शाळांत बारावीचे ४७१ विद्यार्थी शिकतात. बारावीनंतर चांगल्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळावा म्हणून पालक दहावीपासूनच मुलांची चांगली तयारी करून घेतात. दहावी, बारावीचे २३ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात ऑफलाइन वर्ग सुरू झाले. मात्र, या वर्गांना ६० टक्क्यांपेक्षा अधिक उपस्थिती लाभू शकली नाही. त्याला विविध कारणे होती. कोरोनाचा कहर थांबत नसताना अनेक शाळांत शिक्षक कोरोनाबाधित झाल्याने पुन्हा शाळा बंद करण्याचीही वेळ आली. यात प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे नुकसान झाले. त्यामुळे बहुतांश शिक्षण हे ऑनलाइन चार ते पाच तास मोबाइलसमोर बसून विद्यार्थ्यांनी अभ्यास केला. दहावीच्या परीक्षेची तयारी केली; परंतु पुन्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने तयारीवर पाणी फेरले. बोर्डाने दहावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास केले. शाळांनी अंतर्गत गुण द्यायचे आहेत. मात्र, त्यावरही अनेक प्रश्नचिन्ह आहेत. विद्यार्थ्यांचे परीक्षेशिवाय मूल्यमापन, गुणवत्तेची सांगड घालणे अशक्य असल्याचेही अनेक पालकांचे म्हणणे आहे.
---
अकरावीचे प्रवेश कोणत्या निकषावर ?
अकरावी प्रवेशासाठी कोणती गुणवत्ता यादी गृहीत धरणार याची स्पष्टता सीबीएसई बोर्डाने केलेले नाही. त्यामुळे नामांकित महाविद्यालयात प्रवेशासाठी आग्रही विद्यार्थ्यांची संभ्रमावस्था आहे. आयटीआय, पॉलिटेक्निक प्रवेश कसे होणार, असा प्रश्नही पालकांना सतावत आहे.
---
गुणदान समपातळीवर कसे आणणार?
विद्यार्थ्यांच्या वर्षभरातील क्षमतेवर गुणदान शिक्षकांना करावे लागणार आहे; पण यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे व पात्रतेनुसार गुणदान होईल. याची हमी बोर्ड देत नाही. गुणवत्ता यादीच नसल्याने वास्तव मूल्यांकनावर प्रश्नचिन्ह असून अभ्यासू विद्यार्थ्यांवर अन्याय यातून होऊ शकतो.
---
पालकांत तीव्र संताप
दहावीची सीबीएसईची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय एकदम अचूक निर्णय आहे; परंतु पुढे निकालात पूर्व परीक्षा किंवा ऑनलाइन प्रगती बघून टक्केवारी किंवा ग्रेडस् न देता फक्त पास करावे. आणि विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये त्यांच्या आवडत्या क्षेत्रात प्रवेश मिळावा.
- पल्लवी मालाणी, पालक
---
कोरोनाची लाट ओसरेपर्यंत सीबीएसई बोर्डाने थांबायला हवे होते. दहावीत कल कळतो. त्यावरून पुढची दिशा ठरवणे सोपे होते. त्यामुळे आता पुढे काय करावे, अकरावीत प्रवेश कसा मिळेल. आतापर्यंत मुलाने केलेल्या अभ्यासाच्या आकलनाचे मूल्यांकन कसे होईल, असा प्रश्न सतावतोय.
-प्रदीप सुरडकर, पालक
---
पुढच्या प्रगतीचा पाया दहावी आहे. त्यातील मेहनत मुलांचे भविष्य घडवायला मदत करते. ऑनलाइन, स्वाध्याय, पालकांनी स्वत: अभ्यास घेऊन दहावीची तयारी केली. आता परीक्षाच होणार नाही म्हटल्यावर ते परिश्रम व्यर्थ जातील. मुलगा काय शिकला त्याचे गुणांकन कसे ठरणार याची चिंता आहे.
- प्रतीक्षा काळे, पालक
---
अकरावीच्या कोणत्याही शाखेचा विचार केला तर विद्यार्थी कमी आणि उपलब्ध प्रवेश जागा जास्त, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळविण्यासाठी अडचण होणार नाही. मात्र, पॉलिटेक्निकसाठी प्रवेश घेताना अडचणी येऊ शकतात. त्यामुळे मग महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे दहावीचे गुण गृहीत न धरता त्यांची स्वतंत्र प्रवेश परीक्षा घ्यावी हा तोडगा यावर निघू शकतो.
- सतीश तांबट, शिक्षणतज्ज्ञ
---
सीबीएसईचे दहावीतील एकूण विद्यार्थी
१४६० -मुले
१३४० -मुली
--