छत्रपती संभाजीनगर : आरबीआयने दोन हजाराच्या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत व्यवहारात सुरू राहतील, असे जाहीर केले. तिजोरीत ठेवलेल्या गुलाबी नोटा हळूहळू व्यवहारात दिसू लागल्या. मात्र, अनेक व्यापारी असे आहेत की, त्यांनी दोन हजाराच्या नोटा घेणेच बंद केले आहे. तर काही ठिकाणी १०० रुपयांची खरेदी केल्यावर ग्राहक व्यापाऱ्यांना गुलाबी नोट देत आहेत. यामुळे वादावादी वाढली आहे. परिणामी, ग्राहकांना अनेक ठिकाणी मनस्ताप सहन करावा लागत आहे.
३० सप्टेंबरपर्यंत चलनातआरबीआयने जाहीर केल्यानुसार २ हजाराच्या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत व्यवहारात सुरू राहणार आहेत. त्यानंतर या नोटा चलनातून बाद होणार आहेत.
इथे का स्वीकारली जात नाही २ हजाराची नोट१) वीजबिल भरणा केंद्र : जालना रोडवरील वीजबिल भरणा केंद्रात ९०० रुपयांचे बिल भरण्यासाठी दोन हजार रुपयांची नोट दिली तर ती नोट स्वीकारण्यास कर्मचाऱ्याने नकार दिला. आधारकार्ड व पॅनकार्डची झेरॉक्स सोबत आणावी, नोटेचा सीरियल नंबर लिहून द्यावा, मगच नोट घेतली जाईल, असा फलक तिथे लिहून ठेवण्यात आला होता.२) पेट्रोल पंप : क्रांती चौकातील पेट्रोल पंपावर २०० रुपयांचे पेट्रोल भरले व कर्मचाऱ्याकडे २ हजार रुपयांची नोट दिली. त्या कर्मचाऱ्याने सांगितले की, ५०० रुपयांचे पेट्रोल भरून घ्या, मग दीड हजार रुपये परत देतो. कारण, सुट्या नोटा कमी आहेत. याच नाही अनेक पेट्रोल पंपांवर यामुळे वादावादी होत आहे.३) किराणा दुकान : मोंढ्यातील एका किराणा दुकानात दोन हजाराची नोट दिली असता, त्या व्यापाऱ्याने पहिल्यांदा ती नोट स्वीकारण्यास नकार दिला. कारण, एखादी नकली नोट आली तर दिवसभरातील नफ्याचे नुकसान होईल. आमच्याकडे असली व नकली नोट तपासणीची मशिन नसल्याने त्यांनी सांगितले.
२ हजाराची नोट सर्वांनी स्वीकारण्याचे आदेशआरबीआयने दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, दोन हजाराची नोट व्यवहारात ग्राहकांकडून स्वीकारली पाहिजे. बँकांनीही दोन हजाराची नोट ग्राहकांकडून घ्यावी, पण पुन्हा एटीएममध्ये ती नोट टाकू नये.