काय आहे प्रकरण?
मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मुलीच्या लग्नासाठी मुले शोधणे सुरू असताना, फिर्यादीच्या मित्राने त्यांच्या परिचयाचे बाबुराव कोंगळे यांची ओळख फिर्यादीशी करून दिली. कोंगळे याचा मुलगा सागर अभियंता असल्याने फिर्यादीने लग्नास होकार दिला. कोंगळे कुटुंबीयांनी लग्नात खर्च म्हणून ८० हजार रुपये रोख, लग्नाचे कपडे, भांडे व जेवणाची व्यवस्था करून लग्न मंगलकार्यालयात लावून देण्याची अट घातली. फिर्यादीने ती मान्य केली.
२९ नोव्हेंबर, २०२० रोजी २०-२५ लोकांच्या उपस्थितीत पीडिता व सागर कोंगळे यांचा साखरपुडा पार पडला. त्यावेळी आरोपींच्या मागणीनुसार, फिर्यादीने सागरला ३८ हजार ५०० रुपयांची सोन्याची अंगठी व कपडे दिले. साखरपुड्यात १६ मार्च, २०२१ रोजी लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली. लग्नाचा खर्च म्हणून फिर्यादीने नवऱ्या मुलाला २३ मार्च रोजी ५० हजार रुपये दिले. उर्वरित ३० हजार रुपये लग्नाच्या ८ दिवस आधी देतो, असे कबूल केले. त्याच वेळी पूर्वी ठरलेली लग्नाची तारीख १६ मार्च, २०२१ लॉकडाऊनमुळे रद्द करून, २ जून, २०२१ रोजीची निश्चित करण्यात आली.
मुलगी पसंत नसल्याने लग्नास नकार
मात्र, २० मे, २०२१ रोजी आरोपी सागर, त्याचे वडील बाबुराव व आई रेखा कोंगळे हे फिर्यादीच्या घरी गेले. आम्हाला मुलगी पसंत नाही, तुम्ही जर लग्नाचा खर्च म्हणून वाढीव रक्कम देत असाल, तरच लग्न होईल, असा बहाणा करून ‘तुम्हाला काय करायचे ते करून घ्या,’ अशी धमकी दिली. त्यानंतर, आरोपी सागरच्या बहिणी अश्विनी व कांचन यांनीही फिर्यादीला वरीलप्रमाणे मागणी करून धमकी दिली. प्रकरणात मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.