पाथरी (परभणी ) : अवैधरित्या वाळूचे उत्खनन करताना मुदगल येथे नोव्हेंबर महिन्यात उपजिल्हाधिकारी यांनी केलेल्या कारवाईत एक जेसिपी यंत्र पडकले होते, या वाहनावर तहसीलदार यांनी नियमाप्रमाणे कारवाई न करता केवळ 1 लाख 44 हजाराची दंड आकारणी केली. ही कारवाई चुकीची असल्याचा अहवाल मिळताच तहसीलदार यांनी सावरासवर करत याच प्रकरणात दुसऱ्यांदा 9 लाख 83 हजारांचा वाढीव दंड आकारला. तहसीलदारांच्या एकाच प्रकरणातील दुहेरी दंडाची चर्चा तालुक्यात रंगली आहे.
मुदगल येथील वाळू च्या घाटात जेसिपी यंत्राने अवैधरित्या वाळू उत्खनन होत असल्याचा प्रकार उपजिल्हाधिकारी सी.येस. कोकणी यांच्या पाहणीत आढळून आला होता. या वेळी एक जेसीपी यंत्र ही ताब्यात घेण्यात आले. यानुसार जेसीपी चालकावर पोलिसात गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे निर्देश उपजिल्हाधिकारी यांनी तहसीलदार यांना दिले. मात्र, तहसीलदार वासुदेव शिंदे यांनी पोलीस कारवाई करण्याचे टाळून केवळ 60 ब्रास वाळू उत्खनन केल्या प्रकरणी केवळ 1 लाख 44 हजार रुपये दंड आकारला. याप्रकरणी 5 नोव्हेंबर 2017 रोजी मंडल अधिकारी यांनी तहसीलदार यांना अहवाल सादर केला.
या प्रकरणी तहसीलदारांची विभागीय चौकशी सुरु आहे. तहसीलदार यांनी केलेली कारवाई वाळूच्या बाजार मुल्य प्रमाणे केली नसल्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर केला होता. प्रकरण अंगलट येत असल्याचे लक्षात येताच तहसीलदार शिंदे यांनी या प्रकरणी कारवाई चे सुधारित आदेश काढले. यानुसार आता वाळू माफियास नव्याने 9 लाख 83 हजार 400 रुपये दंड भरण्याचे आदेश त्यांनी दिले. एकाच प्रकरणात दोनदा दंड आकारला गेल्याच्या या दुर्मिळ प्रकरणाची चर्चा सध्या तालुक्यात होत आहे.