वाळूज महानगर : चोरट्यांनी साडेदहा लाख रुपये असलेली तिजोरी लांबविली पण दोन टन वजनाची लोखंडी तिजोरी त्यांना उघडता आली नाही. शेवटी त्यांनी ती १०० मीटरपर्यंत ढकलत नेली. तिथे हत्याराने ती फोडण्याचा प्रयत्न करताना ते घामाघूम झाले. तिजोरी फुटलीच नाही. शेवटी पोलीस आल्याची चाहूल लागल्याने चोरटे पळून गेले. तिजोरीतील रोकड वाचली. ( One and a half lakh were saved due to police vigilance in Waluj MIDC area )
ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पंढरपुरात घडली. फ्लिपकार्ट कंपनीच्या कार्यालयाचे शटर उचकटून चोरट्यांनी तिजोरी लांबविली होती. रविवार रात्री १०.३० वाजेच्या सुमारास कार्यालय बंद करून कर्मचारी घरी निघूृन गेले होते. सोमवार पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास या कार्यालयात काम करणारे संदेश रामेश्वर घुवारे हे कार्यालय उघडण्यासाठी आले असता त्यांना कार्यालयाचे शटर उचकटलेले व अर्धे उघडे असलेले दिसले. कार्यालयातील लोखंडी तिजोरी गायब झालेली होती. हा चोरीचा प्रकार असल्याचे लक्षात येताच घुवारे यांनी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी व पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज ठाण्याचे सहायक निरीक्षक एम. आर. घुनावत व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
यावेळी तिजोरी फोडण्याचा आवाज येत असल्याने पोलिसांचे पथक व कंपनीचे कर्मचारी अंधारात आवाजाच्या दिशेने निघाले असता जवळपास १०० मीटर अंतरावर मोकळ्या मैदानातून आवाज येत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. दरम्यान, पोलिस आल्याची चाहूल लागताच तिजोरी फोडणारे चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. यानंतर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तिजोरी उघडून पाहिली असता आतमध्ये ठेवलेले १० लाख ५९ हजार ७९७ रुपये सुरक्षित होते. या कंपनीच्या कार्यालयातील ड्राॅवरमध्ये ठेवलेले २६ हजार रुपये चोरट्यांच्या हाती लागल्याने त्यांनी ही रक्कम लांबविली.
दोन चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैदया कंपनीच्या कार्यालयात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन चोरटे कैद झाले आहेत. पहाटे २ वाजेच्या सुमारास दोन चोरटे या कार्यालयासमोर येताच त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची दिशा बदलून शटरचे लॉक तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र लॉक तुटत नसल्याने चोरट्यांनी काहीतरी हत्याराने शटर उचकटून आत प्रवेश केला. चोरट्यांनी कार्यालयाची झाडाझडती घेऊन ड्राॅवरमध्ये ठेवलेले २६ हजार रुपये काढून घेतले. यानंतर चोरट्यांनी अवजड तिजोरी हत्याराच्या साहाय्याने उखडून काढत तिला ढकलत-ढकलत जवळपास १०० मीटर अंतरावर असलेल्या निर्जनस्थळी नेली. या ठिकाणी तिजोरी फोडत असतानाच पोलिस आले. या प्रकरणी कंपनीचे संदेश घेवारे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजेंद्र बांगर तपास करीत आहेत.