सिल्लोड : औरंगाबाद-जळगाव महामार्गावर गोळेगाव जवळ ओव्हरटेक करण्याच्या नादात दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात ट्रकमधील दोन जणांचा जागीच तडफडून मृत्यू झाला. तर दुसऱ्या ट्रकमधील दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारांसाठी औरंगाबाद येथे पाठवण्यात आले आहे. शनिवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मोहमद शोकेनखान नासिबखान आणि मुस्तकीम गणी अशी मृतांची नावे आहेत. जितेंद्र बुनकर आणि सुंदर रामकीसन हे दोघे जण जखमी झाले आहेत.
गोळेगाव येथे गजानन महाराज मंदिरासमोर हा अपघात झाला. जळगावहून गहूची वाहतूक करणारा ट्रक सिल्लोडच्या दिशेनं जात होता. यावेळेस ओव्हरटेक करताना या ट्रकची औरंगाबाद हून जळगावकडे लिंबू घेऊन जाणाऱ्या ट्रकला धडक बसली.
हा अपघात इतका भीषण होता की मृत्युमुखी पडलेले दोन्ही जण गाड्यांच्या मध्ये दाबले गेले. गोळेगावातील युवकांनी त्यांची सुटका करुन रुग्णवाहिकेला फोन लावला. पण रुग्णवाहिका घटनास्थळी उशिरा पोहोचल्यानं दोघांचा तडफडून मृत्यू झाला. वेळेवर रुग्णवाहिका आली असती तर कदाचित या दोघांचे प्राण वाचू शकले असते. दरम्यान, 108 क्रमांकावर मदत घेतली असता रुग्ण वाहिका कधीच वेळेवर उपलब्ध होत नाही, असा आरोप गोळेगाव येथील युवकांनी केला आहे. यावेळी सिल्लोडचे नगरसेवक सुनील मिरकर यांनी त्यांची रुग्णवाहिका पाठवून जखमींना सिल्लोड येथे उपचारांसाठी घेऊन गेली. तरीही शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही.
या अपघातमुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. या प्रकरणी अजिंठा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद घेण्यात आली आहे