अजिंठा (औरंगाबाद ) : बंदी असतानाही परजिल्ह्यात विक्रीसाठी जाणाऱ्या चारा कुट्टीचे दोन आयशर ट्रक महसूल विभागाने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ताडपत्रीखाली झाकून चाऱ्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यावरुन शिवना -अजिंठा रस्त्यावर सोमवारी ही कारवाई करण्यात आली.
रात्री उशिरापर्यंत अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. या प्रकरणी संजय दयाराम बेलदार (४६, रा. तामसवाडी ता. पारोळा, जि. जळगाव) व माधवराव पोपट पाटील (४९, रा. जुनवने ता.जि. धुळे) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भोकरदन तालुक्यातील धावडा येथून कडब्याची कुट्टी करुन ती दोन आयशर ट्रकमध्ये (क्र. एमएच-१८-एए-१६५१, एमएच १८-एए -०११७) जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथे विक्रीसाठी नेली जात होती. एका ट्रकमध्ये तब्बल ३ टन चारा होता. त्याची किंमत जवळपास ४० हजार रुपये आहे.
अजिंठा येथील तलाठी बी.पी. पाटील, शिवना येथील तलाठी व्ही. आर.शेलकर, कोतवाल राजू पवार यांनी पाठलाग करुन अजिंठा गावाजवळ हे दोन्ही ट्रक पकडले व अजिंठा पोलिसांच्या स्वाधीन केले.
चारा वाहतुकीला जिल्हा बंदीयावर्षी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने जनावरांना चाराटंचाईस सामोरे जावे लागू नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी परराज्यात किंवा परजिल्ह्यात चारा नेण्यास मनाई केली आहे. या आदेशाला न जुमानता ही वाहतूक होत होती.
...तर गुन्हे दाखल होतीलचारा बंदी असताना सदर चारा या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात पळविण्याचा आरोपींचा उद्देश असेल तर सदर आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील. जिल्ह्याबाहेर चारा जाऊ नये यासाठी विविध पथके तैनात करण्यात आले आहेत. चारा पळविणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल.- रामेश्वर गोरे, तहसीलदार, सिल्लोड