फर्दापूर : औरंगाबाद-जळगाव महामार्गावरील फर्दापूर येथे शुक्रवारी मध्यरात्री दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन दोन्ही ट्रकचे चालक जागीच ठार झाले.औरंगाबाद -जळगाव महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरूअसून, हे काम करताना कुठलेही नियोजन केले नसल्याने रस्त्याची अवस्था भयावह झाली आहे. चालकाला जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागते. गेल्या दोन महिन्यांपासून रस्त्याच्या कामामुळे दररोज अपघात होत आहेत.मध्यरात्रीचा अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही ट्रकच्या केबिनचा चुराडा झाला असून, दोन्ही ट्रकच्या केबिन एकमेकांत घुसल्यामुळे चालक जागीच ठार झाले. अथक परिश्रमानंतर दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले.सध्या रस्त्याचे काम चालू असल्याने चालकांना रात्री रोडचा अंदाज येत नाही, त्यामुळे ही वाहने एकमेकांवर आदळून हा भीषण अपघात झाला.यातील एक ट्रक जालना येथून जळगावकडे जात होता, याचा चालक लालू ऊर्फ सोनू भगघन रोकडे (२२, इंद्रानगर खरगोज) व दुसरा ट्रकचा चालक सोहिल मो. शफिक (२२, रा. नेरी, ता. जामनेर जि. जळगाव) हे दोघे ठार झाले. त्यांचे मृतदेह जळगाव येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे.या महामार्गावरील बंद असलेले काम लवकरात लवकर चालू करून पूर्ण करणे गरजेचे झाले आहे.या अपघाताची फर्दापूर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शरद जºहाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सुनील भिवसने, ज्ञानेश्वर सरताळे, जिरी करीत आहेत.
दोन ट्रकची धडक; दोन्ही चालक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 1:12 AM