औरंगाबाद : अहमदाबादमधील इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंचे दुकान फोडून चाळीस लाखांचा माल पळविणाऱ्या औरंगाबाद येथील दोन हमालाना जिन्सी पोलिसांनी अटक केली. चोरीच्या सुमारे १९ लाखाच्या वस्तू नाशिक येथील खरेदीदार व्यापाऱ्याकडून जप्त केल्या.
योगेश बाबाजी पूतमाळे (२१) सतीश रेवननाथ बनकर (३०, दोघे रा. माळीवाडा) अशी अटकेतील त्यांची नावे आहेत. २ डिसेंबर रोजी जिंसी ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांना गस्तीवर असताना शहरातील चोरट्यांनी टेंपोभर मिक्सर नाशिक येथील व्यापाऱ्याला विक्री केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर याविषयी माहिती विचारली. तेव्हा गुजरातमधील असलाली येथील एका दुकानात महिनाभरापूर्वी अशी चोरी झाल्याचे त्यांना समजले. पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी असलाली पोलीस ठाण्यात संपर्क साधून याविषयी पडताळणी केली. तेव्हा असलाली (जि. अहमदाबाद) येथील जगतभाई नरेंद्र पटेल यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तुंचे दुकान फोडून चोरट्यांनी सुमारे ४० लाखांचा माल चोरी केला होता. २ नोव्हेंबर रोजी रात्री ही घटना घडली असे त्यांना सांगण्यात आले. खात्री पटताच पोलिसांनी योगेश आणि सतीश यांना ताब्यात घेतले. चौकशीअंती त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. असलाली येथील जावेद कुरेशी आणि जुबेर खान या साथीदारांच्या मदतीने महाराजा व्हाईट लाईन एजन्सी हे दुकान फोडून त्यातील मिक्सर, एलईडी टीव्ही , ज्यूसर, इस्त्री असा टेम्पो भरून माल औरंगाबादला आणला. नंतर यातील काही माल नाशिक येथील मुगल कलेक्शनचा मालक सज्जू नावाच्या व्यापाऱ्याला विक्री केल्याचे सांगितले. पोलिसांनी आरोपींना सोबत घेऊन नाशिक गाठले आणि व्यापाऱ्यांकडून चोरीचा सुमारे १९ लाख रुपयांचा माल जप्त केला.
=======
गुजरात पोलिसांच्या ताब्यात दिले
जिन्सी पोलिसांनी आरोपी पकडल्याचे कळताच गुजरात पोलीस दलातील निरीक्षक बलदेवसिंग वाघेला आणि कर्मचारी औरंगाबाद शहरात दाखल झाले. त्यांनी आणि जिन्सी पोलिसांनी नाशिक येथे चोरीचा माल जप्त केला आणि मालासह आरोपी गुजरात पोलिसांच्या ताब्यात दिले.
(फोटोसह )