औरंगाबाद, दि. 1 : जुनाबाजार येथे घरासमोर उभी असलेले एक दुचाकी आणि कार एका माथेफिरूने पेटवून दिली. या घटनेत दुचाकी जळून खाक झाल्याने तिचा सांगडाच राहिला तर कारचे मोठे नुकसान झाले. या घटनेचा बारकाईने तपास करून गुन्हेशाखा पोलिसांनी घटनेनंतर अवघ्या काही तासात वाहने जाळणा-या आमेरखान सलिम खान (रा. पडेगाव ) या माथेफिरुस अटक केली. पूर्व वैमनस्यातून त्याने ही वाहने जाळल्याची कबुली दिली.
या बाबत अधिक माहिती अशी की, जुनाबाजार येथील मुख्यपोस्ट कार्यालय परिसरातील रहिवासी सिद्धीकी मोहम्मद सिद्दीकी अब्दुल नईम (रा. जुनाबाजार) व मोहम्मद समिर सिद्दीकी मो. मोईनेद्दीन (रा. जुनाबाजार) परस्पराचे नातेवाईक आहेत. काही दिवसापूर्वी सिद्दीकी यांचा आरोपीसोबत किरकोळ कारणावरुन वाद झाला होता. यावेळी त्याने त्यांना धडा शिकविण्याची धमकी दिली होती. शिवाय अधुन मधून तो त्यांना धमकावायचा. दरम्यान, नेहमीप्रमाणे सिद्धीकी यांनी गुरूवारी रात्री त्यांची कार क्रं (एमएच २०--७७५३) आणि मोपेड (एम.एच.२० सीएफ.२२६६) घरासमोर उभी केली होती.
मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास या दोन्ही गाड्यां जळू लागल्या. यामुळे निघालेला धुर रहिवाश्याच्या घरात गेल्याने परिसरातील लोक झोपेतून उठले. सिद्दीकीही परिवारही घराबाहेर आला. सर्वांनी मिळून जळत्या वाहनांवर पाण्याचा मारा केल्याने जळालेली वाहने विझविली. मात्र, आग विझवण्यास उशीर झाल्याने यात मोपेड जळून खाक झाल्याने तिचा केवळ सांगडाच शिल्लक राहिला तर कारच्या समोरच्या भागाचे मोठे नुकसान झाले.
यानंतर त्यांनी घटनेची माहिती सिटीचौक पोलिसांना दिली. माहिती मिळताच सिटीचौक पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली. तक्रारदार यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलीस संशयिताचा शोध घेत होते. यावेळी आरोपी आमेर पोलिसांना पाहून पळून जात असताना गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास जेरबंद केले. या प्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन आरोपी अटक करण्यात आली आहे.