औरंगाबाद : प्रेस रिपोर्टरचे ओळखपत्र गळ्यात घालून चोरट्या मार्गाने विदेशी दारू विक्री करणाऱ्या वार्ताहरासह त्याच्या साथीदाराला गुन्हे शाखेने सोमवारी बीबी का मकबरा परिसरात अटक केली. आरोपीकडून विदेशी मद्याच्या ६ बाटल्या, मोपेड, २ मोबाइल असा मुद्देमाल हस्तगत केला.
पुष्कर रामचंद्र आहेरकर (२४, रा. अमोदी हिल्स, पहाडसिंगपुरा) आणि किशन राजू कुंडारे (२३) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेकडून प्राप्त माहितीनुसार एक तरुण प्रेस रिपोर्टर असल्याचे कार्ड गळ्यात घालून चोरट्या मार्गाने विदेशी मद्य विक्री करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक मनोज शिंदे, हवालदार संतोष सोनवणे, चंद्रकांत गवळे, भगवान शिलोटे, विशाल पाटील, आनंद वाहूळ आणि रितेश जाधव यांच्या पथकाने खबऱ्यामार्फत त्याला संपर्क केला तेव्हा त्याने दुप्पट दराने दारू देण्याची तयारी दर्शविली. यानंतर त्याने दारू नेण्यासाठी मकबरा परिसरातील मैदानावर बोलावले. पोलिसांनी तेथे धाव घेतली.
तेव्हा तेथे आरोपी पुष्कर हा ‘मुंबई का स्वाभीमान’ या हिंदी दैनिकाचे वार्ताहराचे ओळखपत्र गळ्यात घालून कुंडारेसोबत गप्पा मारत उभा होता. साध्या वेशातील पोलिसांनी त्याच्याकडे दारूची मागणी केली. तेव्हा त्याने कशाची दारू मी पत्रकार आहे, असे सांगून आरडाओरड करीत पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याच्या दुचाकीच्या डिक्कीची झडती घेण्यास तो पोलिसांना विरोध करीत पळून जाऊ लागला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले आणि त्याच्या दुचाकीची झडती घेतली. डिक्कीत विदेशी मद्याच्या ६ बाटल्या आढळल्या. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध बेगमपुरा ठाण्यात गुन्हा नोंदवून अटक केली.