छत्रपती संभाजीनगर : केंब्रिज चौक ते चिकलठाणा दरम्यान तासाभरात दोघांना मारहाण करून लुटणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना एमआयडीसी सिडको पोलिसांनी दहा तासांत अटक केली. तक्रारदाराने लुटणाऱ्याच्या केलेल्या केवळ वर्णनावरून पोलिसांनी आरोपी पकडले. अजय बाबासाहेब गायकवाड (२२), प्रवीण पंडित कांबळे (१९, दोघेही रा. अशोकनगर, सिंधीबन) रोहित सुनील देहाडे (रा. शहानगर) अशी त्यांची नावे आहेत.
मुकुंदवाडीचे रहिवासी शिवाजी उत्तम सोनवणे (४८) हे ३ नोव्हेंबर रोजी केंब्रिज चौकात उभे होते. त्यावेळी ट्रिपल सीट आलेल्या अट्टल गुन्हेगारांनी त्यांच्या जवळ जात त्यांचे हात पकडले. दुसऱ्याने चाकू काढून जिवे मारण्याची धमकी देत त्यांचा मोबाइल हिसकावून पळून गेले. तेवढ्यावर न थांबता त्यांनी पुढे जात रामेश्वर अशोक पांचाळ (१९) यांना मारहाण करून पोबारा केला. अवघ्या तासाभरात त्यांनी दोन लुटमार केली. निरीक्षक गौतम पातारे यांनी तत्काळ उपनिरीक्षक आत्माराम घुगे, अमोल सोनवणे यांना आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना केल्या.
वर्णन सांगताच पोलिसांनी ओळखलेपथकाने दोन्ही घटनास्थळाची पाहणी केली. अंमलदार प्रकाश सोनवने, योगेश म्हस्के, लखन डोभाळ, ऋषिकेश सांगळे, अरविंद पुरी यांनी आरोपींचा शोध सुरू केला. एका तक्रादाराने वर्णन सांगताच त्याला रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे छायाचित्रे दाखवण्यात आली. त्यात त्याने ओळखताच पथक रवाना झाले. त्यात सिंधीबनमधून अजय व त्याच्या साथीदाराला पकडले. ठाण्यात नेताच रोहित सोबत मिळून लुटल्याची कबुली दिली. त्यांच्यावर यापूर्वी ६ ते ७ चोऱ्या व जबरी चोरी केल्याचे गुन्हे दाखल असून रोहित देखील सराईत गुन्हेगार असल्याचे पातारे यांनी सांगितले. उपायुक्त शिलवंत नांदेडकर, सहायक आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. उपनिरीक्षक अमोल सोनवणे अधिक तपास करत आहेत.