औरंगाबाद : वेगाने जाणाऱ्या दुचाकीने सायकलचालकाला पाठीमागून दिलेल्या धडकेत कामगार ठार झाल्याची घटना रविवारी (दि.७) रात्री साडेनऊ वाजता जळगाव रोडवरील साई हॉस्पीटल समोर घडली. मंगेश हरिभाऊ कल्याणकर (३५, रा.राजेसंभाजी कॉलनी, हडको) असे या युवकाचे नाव आहे. दुचाकीवरील दोन जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.
मंगेश कल्याणकर हे टी.व्ही.सेंटर भागातील एक हॉटेलवर कामगार म्हणून काम करीत होते. रविवारी रात्री काम संपल्यावर सायकलवर बसून घराकडे निघाले होते. त्यांची सायकल जळगाव रोडवरील साई हॉस्पीटल समोरून जात असताना पाठीमागून आलेल्या दुचाकीने (एमएच २० ईटी ७२५५) जोराची धडक दिली. या धडकेत मंगेश कल्याणकर रस्त्यावर कोसळले. त्यांना गंभीर दुखापत झाली. दुचाकीवर बसलेले दोघेही खाली कोसळले. अपघात झाल्याचे दिसून येताच नागरिकांनी धाव घेऊन जखमींना जवळच्याच एम्स रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी तपासून मंगेश कल्याणकर यांना मृत घोषित केले.
दुचाकीवरील दोन्ही जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मयत मंगेश कल्याणकर यांच्या पश्चात पत्नी आणि तीन वर्षांचा मुलगा आहे. या प्रकरणी मयत मंगेशचा भाऊ विलास कल्याणकर यांनी हर्सुल पोलीस ठाण्यात या अपघाताबद्दल तक्रार दाखल केली असून दुचाकी (एमएच २० ईटी ७२५५) चालकाविरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ही दुचाकी आणि सायकल जप्त केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख करीत आहेत.