गल्लेबोरगाव : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पळसवाडी गावाजवळ दोन दुचाकींची समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात एक जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला. सोमवारी चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. रोहित विष्णू यादव (१९, रा. सागर, मध्य प्रदेश) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. जखमीचे नाव रात्री उशिरापर्यंत कळू शकले नाही.
रोहित विष्णू यादव हा औरंगाबादहून कन्नडकडे दुचाकीने (क्र. सीजी ०४ सीटी १८५१) जात होता. त्यावेळी कन्नडवरून औरंगाबादकडे येणाऱ्या दुचाकीची (क्र. एमएच १८ बीई २४७४) पळसवाडी गावाजवळ समोरासमोर जोरदार टक्कर झाली. यात मध्य प्रदेश येथील पण सध्या औरंगाबादेत राहणारा रोहित यादव जागीच ठार झाला, तर दुसऱ्या दुचाकीवरील इसम गंभीर जखमी झाला. घटनास्थळी गावकऱ्यांनी धाव घेऊन १०८ रुग्णवाहिकेतून दोघांनाही प्राथमिक आरोग्य केंद्र वेरूळ येथे उपचारासाठी पाठविले. वेरूळ येथील डॉक्टरांनी तपासून एकास मृत घोषित केले. तर जखमीला घाटीत पुढील उपचारासाठी पाठविले. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक सुरेश भाले व खुलताबाद पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. अपघातानंतर महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. अपघातात ठार झालेल्या युवकाला औरंगाबादेत घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
-------------
एकेरी वाहतूकीचा ठरला बळी
धुळे सोलापूर महामार्गाचे काम सुरू असल्याने सध्या वाहतुकीसाठी एकेरी मार्ग आहे. वाहतुकीचा दिवसेंदिवस खोळंबा होत असून, अपघात सत्र थांबता थांबेना झाले आहे. गेल्या पंधरा दिवसांत पळसवाडीच्या दोनशे मीटर अंतरावर हा तिसरा अपघात आहे. त्यामुळे मृत्यूचा तांडव कधी थांबणार, असा प्रश्न पळसवाडी गावकरी करीत आहेत.
-----
फोटो :