कन्नड : विरुद्ध दिशेने धावणाऱ्या दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने दोघे जण जागीच ठार झाले. सोलापूर-धुळे महामार्गावरील अंधानेर बायपासजवळ शुक्रवारी दुपारी १२ वाजता हा अपघात घडला. संजय सखाराम माळवे (२५, रा. सातकुंड) व सागर पांडुरंग काळे(३०,रा. औरंगाबाद) अशी मयतांची नावे आहेत.
औरंगाबाद येथील रहिवासी सागर काळे हा एका खासगी बांधकाम कंपनीत अभियंता म्हणून काम करीत होता. तो शुक्रवारी दुचाकी(क्र. एमएच २० एफडी ७५७७) ने सोलापूर-धुळे महामार्गाने चाळीसगावहून औरंगाबादला घरी चालला होता. तर सातकुंड येथील रहिवासी संजय माळवे हा दुचाकी(क्र. एमएच १९ एजी ००२६)ने औरंगाबादकडून सातकुंड येथे चालला होता. अंधानेर बायपासवर या महामार्गावर रस्त्याच्या एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे. त्यामुळे विरुद्ध दिशेने धावणाऱ्या या दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोराने धडक झाली. या अपघातात दोघेही दुचाकीस्वार जागीच ठार झाले. यावेळी परिसरातील नागरिक तसेच वाहनधारक घटनास्थळी जमा झाले होते. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजीव तळेकर, सपोनि. डी.बी. वाघमोडे, सपोनि. सचिन खटके, पोना. रामचंद्र बोंदरे, पोकॉं. एस.जी. आंधळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. दोघांनाही ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; मात्र वैद्यकीय अधिकारी मनिषा गीते यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
चौकट
नशिबात तोरण नव्हे, मरण होते
गणेश चतुर्थी असल्याने गणपतीची मूर्ती स्थापन करण्यासाठी सागर औरंगाबादला आपल्या घरी जात होता. घराला बांधण्यासाठी मांगल्याचे प्रतीक समजले जाणारे तोरण बांधण्यासाठी आंब्याच्या पानांची पिशवी त्याच्यासोबत होती; मात्र त्याच्या नशीबात तोरण नव्हे, तर मरण आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
फोटो :