आडुळ : ऊसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून येऊन दुचाकीस्वाराने जोराने धडक दिली. यात दुचाकीवरील शिक्षक जागीच ठार झाला आहे. औरंगाबाद सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दाभरूळ शिवारात शनिवारी (दि.२३) रात्री ८ च्या सुमारास ही घटना घडली. सत्यकुमार देवेंद्र उपाध्ये (५०, रा. कासारवाडी, ता. अंबड, मु. शिवाजीनगर औरंगाबाद) असे अपघातात ठार झालेल्या शिक्षकाचे नाव आहे.
सत्यकुमार उपाध्ये हे अंबड तालुक्यातील आपल्या मूळगावी कासारवाडी येथे शनिवारी दुपारी गेले होते. तेथील संपूर्ण कामकाज आटोपून ते एकटे शनिवारी सायंकाळच्या सुमारास रोहिलागड मार्गे औरंगाबादकडे दुचाकी (क्र. एम. एच. २०, एल. एक्स. १९४१) वरून औरंगाबादकडे निघाले होते. दरम्यान, औरंगाबाद सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दाभरूळ शिवारात त्यांच्या दुचाकीसमोर चालत असलेल्या एका ऊसाच्या ट्रॅक्टरला (क्र. एम एच २०, ए. एस. ९९७४ ) ते पाठीमागून जोरदार ध़डकले. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
सत्यकुमार उपाध्ये हे कचनेर येथील श्रीमती धन्नाबाई दीपचंद गंगवाल तांत्रिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. या अपघाताची माहिती कचनेर गावात धडकताच त्यांचे नातेवाईक व तेथील ग्रामस्थांनी आडूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठी गर्दी केली होती. या अपघाताची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात करण्यात आली. पुढील तपास स.पो. नि. अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोड पोलीस करीत आहेत. सत्यकुमार उपाध्ये यांचा मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला गेला. तेव्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने मृतदेह रुग्णवाहिकेत बराच काळ पडून होता. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
------
अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचा फोटो :